मतदार यादी ‘शुद्ध’ की मतदार हक्कांवर गदा? राज्यात तब्बल 2 कोटी मतदार अपात्र
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १३ हजार मतदारांची नावे वगळण्याची शक्यता
मतदार यादीच्या एसआयआर कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील मतदारयादीच्या विशेष सखोल पडताळणीचा (एसआयआर) टप्पा पूर्ण झाला असून, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट करण्यास अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील एकूण ९.७८ कोटी मतदारांपैकी २ कोटी ७ लाख मतदारांचे गणना अर्ज संकलित होऊ शकले नाहीत. हे प्रमाण एकूण मतदारसंख्येच्या २१.१५ टक्के आहे.
मतदारयाद्या अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी एसआयआर मोहीम राबविण्यात येत असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. मृत, दुबार तसेच स्थलांतरित मतदारांच्या नोंदी दूर करण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान आलेल्या अडचणी आणि त्रुटींमुळे पात्र मतदारांची नावेही वगळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ७५.५२ लाख मतदार अनुपस्थित आढळले किंवा त्यांचा शोध लागला नाही. ७६.८० लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे आढळले असून, ३४.८१ लाख मतदार मृत असल्याची नोंद झाली आहे. याशिवाय १७.६३ लाख मतदारांची नावे अन्यत्र नोंदलेली किंवा दुबार असल्याचे समोर आले आहे.
एसआयआर अंतर्गत ३० जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी राज्यभर घरोघरी जाऊन गणना अर्ज जमा केले. या मोहिमेनंतर असंकलित मतदारांच्या तात्पुरत्या याद्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनाही या मतदारांबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुरुस्तीसाठी फॉर्म ८, तर मतदाराचे नाव वगळण्यास हरकत नोंदविण्यासाठी फॉर्म ७ दाखल करता येईल. पात्र मतदारांकडून आवश्यक अर्ज मिळवून त्यांची बूथस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमासंदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांना याबाबत निर्देश दिले असून सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना तातडीने कळविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी सर्व उपलब्ध माध्यमांतून करावी व राजकीय पक्षांना लेखी स्वरूपात माहिती द्यावी असेही आदेशात नमूद आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण/ पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडणार असून मसुदा प्रकाशन ३१ ऑगस्ट २०२६ रोजी होईल. दावा व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर नोटीस टप्पा व दावा-हरकतींची निकाली काढणी ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान पार पडेल. अंतिम प्रकाशन ४ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की या प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्तबद्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व टप्प्यांना वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांनी दावा व हरकती दाखल करण्याचा कालावधी योग्य प्रकारे वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे अडचणी
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ), शिक्षक, कर्मचारी आणि आशा वर्कर्स यांनी पावसाळ्यातही मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत काम केले. मात्र, अपुरे मनुष्यबळ, ॲपमधील तांत्रिक त्रुटी, नेटवर्कच्या समस्या आणि कागदपत्रांची सक्ती यामुळे मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
प्रत्येक बीएलओने मतदारांच्या घरी तीन वेळा भेट द्यावी, असे आयोगाने स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बीएलओ मतदारांच्या घरी न जाता त्यांनाच कार्यालयात किंवा अन्य ठिकाणी बोलावत असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यालयांतूनही हा उपक्रम राबविला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
मतदार यादी शुद्धीकरण आणि विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मतदार यादी मॅपिंगचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांतील ३९ लाख ४१ हजार ९५ मतदारांपैकी ३३ लाख २७ हजार ४८३ मतदारांचे अर्ज डिजिटायझेशन करण्यात आले आहेत.
तर ६ लाख १३ हजार ६१० मतदार एसआयआर प्रक्रियेपासून अलिप्त राहिले आहेत.
अलिप्त राहिलेल्या मतदारांमध्ये मयत, स्थलांतरित, दुबार तसेच सध्या अनुपलब्ध असलेल्या मतदारांचा संभाव्य समावेश आहे. त्यामुळे या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया होणार आहे. मात्र, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदारांकडून दावे आणि हरकती मागवून सुनावणी घेतली जाणार आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ लाख १७ हजार ६४ मतदार एसआयआर प्रक्रियेपासून अलिप्त राहिले आहेत. त्याखालोखाल सोलापूर शहर उत्तरमध्ये ६७ हजार ८०१, अक्कलकोटमध्ये ६५ हजार ६४३ आणि पंढरपूरमध्ये ६२ हजार २२७ मतदारांचा समावेश आहे.
चौकट-
अपात्र ठरलेल्या मतदारांची कारणनिहाय संख्या
कारण---- मतदारसंख्या
कायमस्वरूपी स्थलांतरित---- ७६.८० लाख
मृत मतदार---- ३४.८१ लाख
अन्य कारणे---- २.२३ लाख
एकूण---- २.०७ कोटी

No comments:
Post a Comment