बार्शी आगाराला २० नवीन एसटी बसेस; आ. राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याला यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 10, 2026

बार्शी आगाराला २० नवीन एसटी बसेस; आ. राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याला यश

बार्शी आगाराला २० नवीन एसटी बसेस; आ. राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्याला यश

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सकारात्मक आश्वासन; प्रवाशांचा ताण कमी होणार





बार्शी (कटूसत्य वृत्त) : बार्शी शहरातील वाढत्या प्रवासी वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन आमदार राजेंद्र राऊत यांनी मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत बार्शी आगारासाठी २० नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीची गांभीर्याने दखल घेत परिवहन मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून, बार्शी आगाराला लवकरच २० नवीन बसेस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरील या शहरातून दररोज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. व्यापारी केंद्राबरोबरच बार्शी हे शिक्षण आणि आरोग्य सेवांचेही महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे दररोज हजारो विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते.

सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव आणि मराठवाड्यातील इतर भागांतील विद्यार्थी शिक्षणासाठी, तर ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी बार्शीत येतात. मात्र, सध्याच्या बसफेऱ्या अपुऱ्या पडत असल्याने प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थी आणि रुग्णांना, तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याची बाब आमदार राऊत यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

बार्शीच्या भौगोलिक व सामाजिक महत्त्वाचा विचार करून एसटी सेवेत वाढ करणे आवश्यक असल्याचे मत मांडत त्यांनी आगाराला तातडीने नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बार्शी आगारासाठी २० नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले.

नवीन बसेस उपलब्ध झाल्यानंतर बार्शी आगारावरील प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होणार असून, विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुलभ व नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages