संत मुक्ताई पालखी मार्ग खडतर; आ. अभिजित पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर ठेकेदाराला नोटीस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 10, 2026

संत मुक्ताई पालखी मार्ग खडतर; आ. अभिजित पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर ठेकेदाराला नोटीस

 संत मुक्ताई पालखी मार्ग खडतर; आ. अभिजित पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर ठेकेदाराला नोटीस

पालखी आगमनापूर्वी रस्ते दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याची नागरिकांची मागणी



माढा (कटूसत्य वृत्त) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री संत मुक्ताई महाराजांची पालखी लवकरच माढा तालुक्यात दाखल होणार असताना पालखी मार्गावरील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. रिधोरे–पापनस मार्गे माढा शहरात येणाऱ्या पालखी मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वारकरी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अभिजित पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर संबंधित ठेकेदारास नोटीस बजावण्यात आली आहे.

माढा ते पापनस हा सुमारे १२ किलोमीटरचा पालखी मार्ग अनेक ठिकाणी उखडला असून जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय माढा ते शेटफळ या सुमारे २० किलोमीटरच्या रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टीचे मुरमीकरण अपूर्ण असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यांचे बांधकाम अवघ्या तीन ते चार वर्षांपूर्वी करण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुरुस्तीचे टेंडर पूर्ण झाल्याची माहिती असतानाही प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

पालखी मार्गावरील समस्या लक्षात घेऊन आमदार अभिजित पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. त्यानंतर विभागाने संबंधित ठेकेदारास रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याबाबत नोटीस बजावली आहे. मात्र नोटीस देऊनही कामाचा वेग अपेक्षित नसल्याने पालखी आगमनापूर्वी सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी वारकरी, वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

पालखी मार्गावरील प्रमुख समस्या

  • माढा–पापनस (१२ किमी) मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे.

  • माढा–शेटफळ (२० किमी) रस्त्याचीही गंभीर दुरवस्था.

  • रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टीचे मुरमीकरण अपूर्ण.

  • दुरुस्तीचे टेंडर पूर्ण होऊनही कामाला अद्याप गती नाही.

  • पालखी आगमनापूर्वी तातडीने दुरुस्तीची नागरिकांची जोरदार मागणी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages