सोलापुरातील 'दाल-चावल'ची होणार अचानक तपासणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरात २०० हून अधिक हातगाड्यांवर दाल-चावल विकला जातो. मात्र, एकाही गाड्यावर दाल-चावल शाकाहारी की मासांहारी आहे, याचा फलक दिसत नाही. दररोज हजारो सोलापूरकर दाल-चावलचा आस्वाद घेतात, पण त्याची गुणवत्ता तपासली जात नाही.
एमआयडीसी पोलिसांत एक गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील दाल-चावल गाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर शहरातील कीर्तीनगर येथील एमआयडीसी हद्दीतील एका कार्यक्रमात दिलेल्या दाल-चावलमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी भाजप नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार केली आहे.
सोलापूर शहरातील सर्व दाल-चावल विकणाऱ्या गाड्यांची तातडीने तपासणी करावी. मांसाहारी घटक किंवा चरबी वापरणाऱ्यांनी तसे फलक गाड्यांवर लावावेत, अशीही मागणी नगरसेविका वाडेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यानुसार आता सोलापूर शहरातील प्रत्येक दाल-चावल गाड्यांची अचानक तपासणी करण्यात येईल, असे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले.
...तर एक लाख रुपयांचा दंड
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांनुसार, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मेनू कार्डवर आणि दर्शनी भागात अन्नपदार्थ शाकाहारी की मांसाहारी आहेत, हे स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. हा नियम मोडल्यास परवाना रद्द किंवा एक लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. दुसरीकडे अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment