माऊली पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, प्रशासनाच्या वतीने जंगी स्वागत, मात्र वाहतूक कोंडीमुळे पालकमंत्री नाराज - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 20, 2026

माऊली पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, प्रशासनाच्या वतीने जंगी स्वागत, मात्र वाहतूक कोंडीमुळे पालकमंत्री नाराज

 माऊली पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, प्रशासनाच्या वतीने जंगी स्वागत, मात्र वाहतूक कोंडीमुळे पालकमंत्री नाराज

नातेपुते (कटूसत्य वृत्त):- 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी...' अशा नितांत भक्तीभावाने ओथंबलेल्या वातावरणात, टाळ-मृदंगाचा गजर आणि 'ज्ञानोबा-माउली-तुकाराम'च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांना घेऊन माऊली विठुरायाच्या भेटीला निघाले. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी माऊलींच्या पालखी सोहळयात सहभागी झाले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील बरड येथील मुक्काम करून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्हा सरहद्द धर्मपुरी या ठिकाणी रविवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता मोठ्या दिमाखात आगमन झाले. त्यावेळी तेथील संपूर्ण परिसर हरिभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, मा.आ.राम सातपुते, मा.आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ.उत्तम जानकर, मा.आ.रामहरी रूपनवर, सोलापूर जिल्हाधिकारी एस.कार्तिकेन,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,  सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, प्रांताधिकारी विजया पारगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी पांढरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, यांनी माऊली पालखी सोहळ्याचे व पालखी रथा बरोबर असणाऱ्या अश्वांचे आणि दिंड्यांचे स्वागत केले. धर्मपुरी ग्रामस्थ, महिला बचत गटाच्या सदस्यांनी तसेच माजी सरपंच बाजीराव काटकर, सरपंच नेता झेंडे यांनी माऊलीच्या पालखीवर गुलाब पाकळ्याचे उधळण करत स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी धर्मपुरी बंगला तसेच शिखर शिंगणापूर चौक येथील विसावा या ठिकाणी वारकरी व ग्रामस्थांना दर्शनाचा लाभ देत श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी सोहळ्याचे नातेपुते नगरीत मुक्कामाच्या ठिकाणी पालखी मैदान येथे आगमन झाले. येथील समाज आरती झाल्यानंतर नातेपुते व नातेपुते परिसरातील लाखोच्या संख्येने आलेले भाविक भक्त यांनी भक्तिमय वातावरणात माऊली पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.प्रशासनाकडून वारकऱ्यांची विशेष काळजी घेण्यात आली होती. स्वच्छतेबरोबरच, सर्व सुविधा नातेपुते नगरपंचायतीकडून पुरवण्यात आल्या आहेत. तसेच माऊलींच्या स्वागतासाठी नातेपुते ग्रामस्थांकडून रस्त्यावर नयनरम्य रांगोळी काढण्यात आली होती नातेपुते ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था, दुकानदार, व्यापारी वर्ग,  यांच्याकडून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ, पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात येत होत्या. नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी पालखीतळ, येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


चौकटीत : 
पालखी सोहळ्यात लोकप्रतिनिधी व अधिकारी वारकरी पेहरावात दिसून आले.
पालकमंत्री जयकुमार गोरे, मा.आ. राम सातपुते,  जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन, मुख्य कार्यकारी कुशल जैन,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सिने कलाकार भाऊ कदम यांनी वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगाच्या गजरात पायी चालत आनंद घेतला.


चौकटीत :
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पोलीस प्रशासनावर नाराजी
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहने अनेक वेळ जाग्यावर थांबून होती. वाहतूक कोंडीमुळे पालकमंत्री जयकुमार गोरे सह अनेक लोकप्रतिनिधी तसेच  जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन, पोलीस अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांना पालखी स्वागताला पोहोचण्यासाठी वाहनांचा ताफा सोडून मोटर सायकल चा आधार घ्यावा लागला. अनेक दिंड्यातील ट्रक व इतर वाहने रस्त्यावर आडवी-तिडवी लावण्यात आली होती. कुठल्याही प्रकारची वाहतुकीची शिस्त नसल्याने व वाहतूक पोलीस अधिकारी रस्त्यावर नसल्याने वाहतूक कोंडी झाली असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आले. अनेक दिंड्यातील ट्रक रस्त्यावर लावून दिंड्यातील वारकरी रस्त्यावर जेवण करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याचे निदर्शनास आले. वाहतुकीच्या समस्या बाबत पोलीस प्रशासनाने खबरदारी न घेतल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाहतुकीच्या समस्या बाबत सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याजवळ नाराजी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages