मोहोळ पंढरपूर कार्यक्षेत्रात नको; भाजपची ८० ठरावांसह अधिकृत हरकत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 8, 2026

मोहोळ पंढरपूर कार्यक्षेत्रात नको; भाजपची ८० ठरावांसह अधिकृत हरकत

 मोहोळ पंढरपूर कार्यक्षेत्रात नको; भाजपची ८० ठरावांसह अधिकृत हरकत




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय पंढरपूर येथे स्थापन करण्याच्या प्रक्रियेत मोहोळ तालुक्याचा पंढरपूर कार्यक्षेत्रात समावेश करण्यास भाजपने तीव्र विरोध दर्शविला आहे. ७९ ग्रामपंचायतींचे ठराव आणि अनगर नगरपंचायतीचा ठराव अशा एकूण ८० ठरावांसह अधिकृत हरकत दाखल करत मोहोळ तालुका पूर्वीप्रमाणे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा भाजपचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले.

शासनाच्या प्रस्तावानुसार मोहोळ तालुक्याचा समावेश प्रस्तावित पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात करण्यात येणार आहे. यासंदर्भात हरकती व सूचना ९ जुलै २०२६ पर्यंत लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यानुसार भाजपच्या वतीने सविस्तर हरकत नोंदविण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, मोहोळ तालुक्याचा पंढरपूर कार्यक्षेत्रात समावेश झाल्यास नागरिकांना शासकीय कामांसाठी अधिक अंतराचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाढेल. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच विविध शासकीय कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होईल.

पंढरपूर हे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या कायम असून, त्याचा फटका शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसू शकतो. त्याउलट सध्या मोहोळचा सोलापूरशी दळणवळण आणि प्रशासकीय संपर्क अधिक सुलभ असल्याने विद्यमान व्यवस्था कायम ठेवणेच नागरिकांच्या हिताचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नवीन प्रशासकीय रचनेमुळे अनावश्यक गोंधळ निर्माण होऊन नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतील. त्यामुळे मोहोळ तालुक्याचा प्रस्तावित पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून वगळून पूर्वीप्रमाणे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी सतीश काळे, रमेश माने, अक्षय खताळ, लखन शिंदे, बालाजी नरुटे, धनाजी गावडे, जगन्नाथ कोल्हाळ, विकास वाघमारे, संजीव खिलारे, अस्लम चौधरी, हेमंत गरड, सुशील क्षिरसागर, भारत सुतकर, सागर राजेपांढरे, शुक्राचार्य हावाळे, फंटू गोफणे, मोहन होनमाने, कालिदास गावडे, नागेश साठे, उल्का पाटील, यशोदा कांबळे, नारायण गुंड, विक्रम गुंड, श्रीकांत घाटुळे, विठ्ठल कारंडे, विशाल थिटे, विशाल भडकवाड आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages