संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी खा. प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचे साकडे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी लष्कर परिसरातील जगदंबा चौक येथे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत गुलाबाच्या पाकळ्यांची पायघड्या, पुष्पवृष्टी, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठूनामाच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत राज्यात सुख, शांती, समृद्धी आणि सामाजिक ऐक्य नांदो, देशावर कोणतेही संकट येऊ नये, बळीराजाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळून वरुणराजाची कृपा व्हावी, प्रत्येक कुटुंब निरोगी व आनंदी राहावे तसेच महाराष्ट्र संतपरंपरेच्या मार्गावर अखंड प्रगती करत राहावा, असे भावपूर्ण साकडे घातले. पालखी आगमनावेळी खासदार वाघमारे यांनी उपस्थित महिलांसमवेत टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात फुगडी खेळत भक्तीभाव आणि आनंदाचा अनोखा संगम अनुभवला. "गण गण गणात बोते" आणि "विठ्ठल... विठ्ठल..." या नामघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. पांढऱ्याशुभ्र वेशभूषा, हातातील भगव्या पताका आणि मुखी अखंड हरिनाम घेत चालणाऱ्या वारकऱ्यांनी शिस्त, सेवाभाव आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंगांच्या सुरांनी उपस्थित अबालवृद्ध भाविकांना भक्ती आणि अध्यात्माचा अविस्मरणीय अनुभव दिला याप्रसंगी शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे यांच्या वतीने भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नगरसेविका कल्पना कदम, दीपक पाटील, अविनाश जाधव, धनंजय पाटील, मोहन नारळे, दिनेश लोणार, भैय्या माने, प्रशांत लोणार, हुलजनतीवाले, मंगेश जंगडेकर, गणेश तुपदोळे यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा पालखी सोहळा भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय उत्सव ठरला.

No comments:
Post a Comment