मोहोळ येथे ‘अलायवस लाईफ सायन्सेच्यावतीने विज्ञान-गणित शिक्षकांची कार्यशाळा
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- अलावस लाईफ सायन्सेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित ‘प्रोजेक्ट VIGYASA – विज्ञान की जिज्ञासा’ या दोन दिवसीय विज्ञान व गणित शिक्षक क्षमता विकास कार्यशाळेचा उत्साहात समारोप झाला.
उर्मी फाउंडेशन, पुणे आणि मोहोळ विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ जुलै २०२६ रोजी लोकसेवा हॉटेल, मोहोळ येथे आयोजित या कार्यशाळेत मोहोळ तालुक्यातील माध्यमिक शाळेतील विज्ञान व गणित विषयाचे ५० शिक्षक सहभागी झाले होते.कार्यशाळेचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तसेच विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन अधिक प्रभावी, प्रयोगाधारित आणि विद्यार्थीकेंद्रित करणे हा होता.
दोन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट आँफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी विज्ञान व गणित अध्यापनातील आधुनिक पद्धती, प्रयोगाधारित शिक्षण, कृतीशील उपक्रम, नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्र आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी विकसित करण्यासाठी आवश्यक कौशल्यांवर सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षक अशोक रुपनर, प्रशांत कुमार, तेजस चिंबळकर, मनीषा पिंगळे, प्रांजली सोहनी आणि श्याम चकोडी यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, कृती आणि अध्यापन तंत्रांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. सहभागी शिक्षकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्यक्ष प्रयोगांमध्ये सहभाग नोंदविला.
उर्मी फाउंडेशनचे सचिव राहुल शेंडे आणि प्रज्वल पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी. कुंभार व तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यशाळेस विज्ञान केंद्र सोलापूरचे गंभीर व दास यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.या कार्यशाळेत दोन दिवसात दिलेल्या प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले.या कार्यशाळेतील विज्ञान -गणित प्रात्यक्षिक कार्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल असे मनोगत प्रशिक्षकांनी व्यक्त केले.
या दोन दिवसीय प्रशिक्षणामुळे शिक्षकांना विज्ञान व गणित विषय अधिक प्रभावी, रंजक आणि विद्यार्थीकेंद्रित पद्धतीने शिकविण्यासाठी उपयुक्त कौशल्ये प्राप्त झाली असून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल, संशोधनवृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास या उपक्रमाची निश्चितच मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. सहभागी शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करून कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.
.png)
No comments:
Post a Comment