राजकारणामुळे रस्ता काम रखडले; नागरिकांना त्रास, अमोल शिंदे यांचा सवाल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निराळे वस्ती या प्रमुख रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही गेल्या नऊ महिन्यांपासून काम रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अमोल शिंदे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत काम रखडण्यामागे नेमके अधिकारी, कंत्राटदार की टक्केवारीचे राजकारण जबाबदार आहे, असा सवाल उपस्थित केला आहे.
अमोल शिंदे म्हणाले की, शहरातील महत्त्वाच्या रस्त्याचे काम दीर्घकाळ प्रलंबित असल्याने नागरिकांना वाहतुकीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. तसे न झाल्यास या प्रकरणात काहीतरी संशयास्पद घडत असल्याचा नागरिकांचा समज अधिक दृढ होईल, असेही त्यांनी म्हटले.
प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काम सुरू करून पूर्ण करावे, अन्यथा नागरिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक अमोल शिंदे यांनी दिला.

No comments:
Post a Comment