भोसले पिता-पुत्रांचा चपळगाव-बावकरवाडीत नागरी सत्कार
समाजहिताच्या कार्याची ग्रामस्थांकडून मानपत्र देऊन दखल
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच श्री गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त समाजहिताचे विविध उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने व यशस्वीपणे राबविल्याबद्दल चपळगाव व बावकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले या पिता-पुत्रांचा मानपत्र प्रदान करून नागरी सत्कार करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास प्रशासक सरपंच वर्षा सिद्धाराम भंडारकवठे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे, गणेश कोळी, ग्रामपंचायत अधिकारी विनोद डावरे, गावचे सुपुत्र सीए ओंकारेश्वर उटगे, ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर वाले, लिपिक उमेश सोनार, विजय कोरे, धर्मेंद्र दुलंगे, प्रकाश बुगडे, रतन कोरे, विष्णुवर्धन कांबळे, बसवराज हन्नुरे, रविकांत कोरे, पत्रकार शंभुलिंग अकतनाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशासक सरपंच वर्षा भंडारकवठे म्हणाल्या की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या कार्यामुळे अक्कलकोटचे नाव जगभर पोहोचले आहे. मंडळामार्फत राबविण्यात येणारे प्रत्येक उपक्रम वर्तमान, भूत आणि भविष्य यांची सांगड घालणारे आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रम आजच्या तरुण पिढीसाठी दिशादर्शक ठरत असून सामाजिक बांधिलकी जपत भोसले पिता-पुत्रांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान करण्यात येत आहे.
सत्काराला उत्तर देताना संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी चपळगाव-बावकरवाडी ग्रामस्थांचे आभार मानले. चपळगावकरांनी दिलेला हा सन्मान संपूर्ण अन्नछत्र मंडळ परिवारासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही सेवा, संस्कार आणि समाजहिताचे उपक्रम अधिक जोमाने राबविण्याचा संकल्प यानिमित्ताने अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांनी सामाजिक कार्याची दखल घेत भोसले पिता-पुत्रांच्या कार्याचा गौरव केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment