अमित शाह, तुमचं तोंड कोणी शिवलंय का?" गृहमंत्र्यांच्या मौनावर मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; राज्यसभेत जोरदार गदारोळ!
राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांचा हंगामा
RAF च्या बंदुकांच्या गोळ्यांचे हिशेब ठेवा", सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला बजावलं
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- पेपरफुटीविरोधी विधेयक राज्यसभेत मांडले जात असतानाच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावर आणि पोलिसांच्या कारवाईवर गृहमंत्री मौन बाळगून का आहेत, असा संतप्त सवाल करत खरगे यांनी, “गृहमंत्रीजी, तुमचं तोंड कोणी शिवलंय का?” असा थेट प्रश्न राज्यसभेत विचारला.
खरगे यांच्या या विधानावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला असून सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला.
कॉक्रोच जनता पार्टीच्या २० जुलै रोजी आयोजित ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज कारवाईचा मुद्दा खरगे यांनी लावून धरला. दिल्लीत विद्यार्थ्यांवर आणि आंदोलकांवर एवढी मोठी कारवाई होत असताना, देशाचे गृहमंत्री सभागृहात किंवा बाहेर यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत; यावरून काँग्रेसने शाह यांच्या अनुपस्थितीवर आणि मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“जनशक्ती तुम्हाला खेचून बाहेर आणेल”
जंतरमंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा तीव्र निषेध करताना खरगे म्हणाले, “गावागावांतून आणि इतर राज्यांतून आलेल्या निष्पाप मुलांवर छर्रे (पेलेट गन) चालवले जात आहेत. यात एका विद्यार्थ्याचा डोळा गेला, कोणाचा कान तर कोणाचा हात निकामी झाला. या अमानुष कारवाईला जबाबदार कोण? गृहमंत्री अमित शाहच यासाठी जबाबदार आहेत.”
सभागृहातील भाजप नेत्यांनी खरगे यांच्या भाषेवर आक्षेप घेत ती ‘असंसदीय’ असल्याचे म्हटले. यावर स्पष्टीकरण देताना खरगे म्हणाले, “मी कोणतीही असंसदीय भाषा वापरलेली नाही. मी बंद खोलीत बसलेल्या गृहमंत्र्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही जास्त काळ लपून राहू शकत नाही. मी गृहमंत्र्यांना वैयक्तिकरित्या ओढून काढेन असे म्हटले नाही, तर देशातील ‘जनशक्ती’ म्हणजेच नागरिक, विद्यार्थी आणि महिला तुम्हाला बाहेर पडण्यास भाग पाडेल.”
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत अमित शाह यांच्या अनुपस्थितीवर टीका केली. गृहमंत्र्यांचे या मुद्द्यावरील मौन हे त्यांच्या ‘गुन्हेगारीची आणि दोषाची कबुली’ देण्यासारखे आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. २० जुलै रोजी पोलिसांना गोळीबाराचे आदेश कोणी दिले, याचे स्पष्टीकरण गृहमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी काँग्रेस खासदारांकडून केली जात आहे.
पेपरफुटी विरोधी विधेयक केवळ ‘डोळ्यात धूळफेक’: खरगे
लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ‘सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक २०२६’ राज्यसभेत मांडण्यात आले. या विधेयकावर बोलताना खरगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हे नवीन विधेयक म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याचा आरोप त्यांनी केला.
“पेपर लीकमुळे देशातील लाखो तरुण आणि निष्पाप विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. जुन्या कायद्यातील काही आकडे बदलून हे नवीन विधेयक आणले गेले आहे, त्याने काहीही बदलणार नाही. मोठे दंड, कडक शिक्षा, विशेष कृती दल (STF) आणि जलद गती न्यायालयांची तरतूद करून पेपर लीक थांबणार नाहीत. जोपर्यंत परीक्षा घेण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल होत नाहीत, तोपर्यंत काहीही सुधारणार नाही. आम्ही २०२४ मध्येच कडक कायद्याची मागणी केली होती, पण सरकारने ती फेटाळली होती,” असे खरगे यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश!
माजी IPS अधिकारी यशोवर्धन आझाद व पॅलेट गनच्या गोळ्या लागून जखमी झालेल्या दोन व्यक्तींनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जेव्हा सामान्य नागरिक आंदोलनात उतरलेले असतात, तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा पथकांकडून पॅलेट गनच्या वापरावर बंदी आणली जावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेच्या माध्यमातून केली आहे. या याचिकांवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेस दिले. जंतरमंतरवर आंदोलनादरम्यान तैनात असलेल्या RAF अर्थात रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांच्या बंदुकांच्या गोळ्यांचा हिशेब ठेवावा, असे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.
याचिकाकर्त्यांचे दावे काय?
याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये दिल्ली पोलिसांनी वापर केलेल्या बॅलेट गनबाबत प्रामुख्याने आक्षेप घेण्यात आले आहेत. याचिकाकर्त्यांच्या मते, पॅलेट गन या कमी हानी करणाऱ्या किंवा अजिबात हानी न करणाऱ्या म्हणून खऱ्या बंदुकांना पर्याय म्हणून वापरल्या जातात. पण जेव्हा त्यांचा वापर मोठ्या जमावावर अतिशय जवळून केला जातो, तेव्हा त्यातून जीवघेणी किंवा गंभीर इजा होऊ शकते. जंतरमंतरवर झालेल्या पॅलेट गनच्या वापरामध्ये एका १९ वर्षांच्या मुलाच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. याच संदर्भात याचिकाकर्त्यांनी दिल्ली पोलिसांना याचिकेत लक्ष्य केलं आहे.


No comments:
Post a Comment