उजनी धरण पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी गणेश चिवटे मैदानात
आठ तास वीजपुरवठ्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील उजनी धरण पट्ट्यातील गावांमध्ये शेतीपंपांसाठी केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. ऊस, डाळिंब, केळी, चारा तसेच इतर नगदी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने ही पिके करपण्याच्या मार्गावर असून हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी आज सोमवारी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उजनी धरण पट्ट्यातील गावांना किमान आठ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात महावितरणकडून होत असलेल्या अपुऱ्या आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उजनी धरण पट्ट्यातील अनेक गावांमध्ये शेतीपंपांना फक्त दोन तास वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना आवश्यक तेवढे पाणी देता येत नाही. परिणामी ऊस, डाळिंब, केळी, जनावरांसाठीचा चारा तसेच इतर नगदी पिकांचे उत्पादन धोक्यात आले आहे. पिकांचे नुकसान होण्याबरोबरच पशुधनासाठी चाऱ्याचा गंभीर प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीपंपांसाठी किमान आठ तास अखंडित व नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
यावेळी गणेश चिवटे यांनी उजनी धरण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाची तीव्रता अधोरेखित करताना सांगितले की, “उजनी धरण पट्ट्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ वीजपुरवठ्याचा प्रश्न नसून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांच्या हातातले सर्व काही जाईल. त्यामुळे या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळावा, यासाठी आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करत आहोत.”
या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्य शासन पातळीवरही हालचाली सुरू झाल्या असून उद्या मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहितीही गणेश चिवटे यांनी दिली. या बैठकीत उजनी धरण पट्ट्यातील वीजप्रश्न, शेतकऱ्यांची सद्यस्थिती आणि शेतीपंपांसाठी आवश्यक वीजपुरवठा यावर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उजनी धरण पट्ट्यातील गावांमध्ये सध्या शेतीपंपांसाठी अपुरा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तसेच बागायती पिकांसाठी नियमित पाणीपुरवठा अत्यावश्यक असताना केवळ दोन तास वीज मिळत असल्याने शेती व्यवस्थापन कोलमडत चालले आहे. त्यामुळे शासनाने आणि महावितरणने तातडीने हस्तक्षेप करून या भागाला आठ तास वीजपुरवठा देण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ बापू झोळ, वाशिंबे गावचे उपसरपंच अमोल पवार, अमोल भोईटे आणि अजित झोळ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment