शेततळ्यात पडलेल्या कोल्ह्याला मिळाले जीवदान!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे शेततळ्यात पडलेल्या एका कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. 'वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन, सोलापूर' (WCAS) च्या रेस्क्यू पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवून कोल्ह्याला जीवदान दिले.
दोन दिवसांपासून अडकला होता कोल्हा
पोखरापूर येथील शेतकरी महेश विश्वनाथ वाघमारे यांच्या शेततळ्यात दोन दिवसांपूर्वी एक कोल्हा अपघाताने पडला होता. शेततळ्याच्या रचनेमुळे त्याला स्वतःहून बाहेर पडणे शक्य होत नव्हते, त्यामुळे तो तिथेच अडकून पडला होता. या घटनेची माहिती मिळताच वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे उमेश सरगर यांनी त्वरित संतोष धाकपाडे यांना याविषयी कळवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून WCAS च्या रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
नियोजनबद्ध रेस्क्यू आणि सुटका
पथकातील सदस्यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत, नियोजनबद्ध पद्धतीने बचाव मोहीम सुरू केली. काही वेळातच कोल्ह्याची शेततळ्यातून सुखरूप सुटका करण्यात आली. बाहेर काढल्यानंतर कोल्ह्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला कोणतीही जखम झाली नसल्याची आणि प्रकृती उत्तम असल्याची खातरजमा केल्यानंतर, त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
वन्यजीव संकटात असल्यास १९२६ वर संपर्क साधण्याचे आवाहन
या यशस्वी मोहिमेनंतर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. वन्यजीव मानवी वस्तीत आल्यास किंवा संकटात आढळल्यास त्यांना स्वतः कोणतीही इजा करू नये. अशा वेळी त्वरित वन विभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर किंवा वन्यजीव बचाव संस्थेशी संपर्क साधावा. नागरिकांच्या जागरूकतेमुळेच अनेक वन्यजीवांचे प्राण वाचवणे शक्य होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बचाव कार्यात WCAS चे अजित चौहान, सुरेश क्षीरसागर, लखन भोगे आणि राहुल दोरकर यांनी मोलाचे योगदान दिले.
.png)
No comments:
Post a Comment