उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम' जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा : अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या सूचना
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार 2030 पर्यंत 15 वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुषांना 100 टक्के साक्षर व संख्याज्ञानी बनवण्याचे ध्येय ठेवून केंद्रपुरस्कृत 'उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम' 2022-23 ते 2026-27 या कालावधीत राबवण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सोलापूर मनपा उपआयुक्त अशिष लोकरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर प्राचार्य डॉ. प्रभाकर बुधारम, जिल्हा सांख्यिकी उपआयुक्त संगीता मोरे, विस्तार अधिकारी सुहास गुरव, मनपा प्रशासन अधिकारी सुरेश कासार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आनंद ढेपे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
योजनेचा उद्देश
अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी म्हणाले, या कार्यक्रमांतर्गत 15 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर व्यक्तींना पायाभूत साक्षरता - वाचन, लेखन व संख्याज्ञान यासोबतच आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्य जागरूकता, बालसंगोपन, कुटुंब कल्याण, मूलभूत शिक्षण, स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता व उच्च कौशल्य इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जाणार आहे.
जिल्ह्यात 2023-24 पासून अंमलबजावणी
सदर कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यात सन 2023-24 पासून कार्यान्वित आहे. अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळा स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. राज्यस्तरावर शालेय शिक्षण मंत्री हे नियामक समितीचे अध्यक्ष असून नियमित आढावा घेतात. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी नियामक परिषदेचे अध्यक्ष तर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यामार्फत अंमलबजावणी केली जाते.
2011 जनगणनेनुसार उद्दिष्ट राज्यात गेल्या तीन वर्षांपासून ही योजना सुरू असून, 2011 च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी असाक्षर लोकसंख्येच्या प्रमाणात वार्षिक उद्दिष्ट निश्चित केले जाते.
प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना
अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी यांनी सांगितले की, कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याच्या आराखड्यानुसार जिल्हास्तरावर नियोजन करावे. निश्चित केलेल्या असाक्षर उद्दिष्टपूर्तीसाठी मोहीम राबवावी. नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापनाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावेत. जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून विविध आढावा बैठकीत 'उल्लास' कार्यक्रमाचा आढावा घ्यावा. शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम 100% यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

No comments:
Post a Comment