पंढरपूर–लोणंद रेल्वे मार्गाला गती; शेतकरी, नागरिकांच्या प्रश्नांवर थेट चर्चा
खा. मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने रेल्वे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावित पंढरपूर–लोणंद (पंढरपूर–फलटण) रेल्वे मार्गासंदर्भातील विविध प्रश्न, अडचणी, हरकती व नागरिकांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पुढाकाराने शिवामृत दूध संघ येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीला रेल्वे निर्माण विभाग, पुणेचे उपमुख्य अभियंता मोहित सिंग उपस्थित होते. त्यांनी रेल्वे मार्गाबाबत नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधत त्यांच्या सर्व शंकांचे समाधानकारक निरसन केले.
बैठकीदरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या संरेखन , भूसंपादन, शेतकऱ्यांच्या जमिनी, नुकसानभरपाई, रेल्वे क्रॉसिंग, सेवा रस्ते, पूल, स्थानके, पर्यायी मार्ग तसेच प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. रेल्वे मार्गामुळे प्रभावित होणाऱ्या गावांतील नागरिकांनी आपल्या सूचना, हरकती आणि समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रत्येक प्रश्नाची संयमाने दखल घेत रेल्वे अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी स्पष्ट करत नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
या बैठकीस पंढरपूर, माळशिरस आणि फलटण तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. अनेक वर्षांपासून रेल्वे प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका आणि गैरसमज दूर करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी, हरकती अथवा सूचना असल्यास संबंधित ग्रामपंचायतींचे ठराव करून रेल्वे प्रशासनाकडे पाठवावेत, असे आवाहन केले. प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे आणि विकासकामे करताना शेतकऱ्यांच्या हिताला कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचू नये, अशी ठाम भूमिका त्यांनी बैठकीत मांडली.
तसेच उपस्थित नागरिकांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेत संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना सर्व सूचना व हरकतींचा सकारात्मक विचार करून नागरिकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशा स्पष्ट सूचना खासदार मोहिते पाटील यांनी दिल्या.
बैठकीनंतर अनेक नागरिकांनी प्रथमच रेल्वे प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केले. रेल्वे प्रकल्पाबाबत अनेक दिवसांपासून मनात असलेल्या शंका या बैठकीमुळे दूर झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भविष्यातही अशाच पद्धतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहिल्यास प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक सुलभ होईल, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संभाजीराजे शिंदे यांनी या बैठकीचे आयोजन करून रेल्वे अधिकाऱ्यांना थेट नागरिकांसमोर आणल्याबद्दल खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे विशेष आभार मानले. रेल्वे मार्गासंदर्भातील अनेक शंका-कुशंका दूर झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment