सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे 50 हजार वारकऱ्यांना निःशुल्क रेनकोट वितरण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारी 2026 च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेकडून वारकऱ्यांसाठी व्यापक आणि सुसूत्र नियोजन करण्यात आले आहे. यंदा सुमारे 50 हजार वारकऱ्यांना मोफत रेनकोटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
आषाढी वारी नियोजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जैन यांनी सांगितले की, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा विचार करून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. पावसापासून संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर रेनकोटचे वितरण करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
वारकरी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे, औषधोपचार व्यवस्था, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, पथदिवे तसेच रस्त्यांची दुरुस्ती यांसह मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वारी मार्गावरील ग्रामपंचायती, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून सर्व विभागांमध्ये समन्वय साधून काम सुरू आहे.
"वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. आषाढी वारी सुरक्षित, सुरळीत आणि सुविधायुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे," असा विश्वास कुशल जैन यांनी व्यक्त केला.
या नियोजनामुळे यंदाची आषाढी वारी अधिक सुव्यवस्थित आणि सुरक्षित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment