ग्रामीण भागाला पूर्वीप्रमाणे किमान आठ तास वीज पुरवठा करा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या शेती पंपांचा वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे आठ तास करण्यात यावा पाणी व अपुऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांचे होणारे पिकांचे नुकसान तात्काळ थांबवण्यात यावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने दोन दिवसात वीज पुरवठा पूर्ववत सुरु करावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे.
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीवर असलेल्या गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, पटवर्धन कुरोली येथील बंधाऱ्यातील पाणी विविध गावच्या पाणी पुरवठा योजनांसाठी राखीव ठेवले आहे. हे पाणी नदी काठच्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी उचलू नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दररोज केवळ २ तास वीजपुरवठा सुरु ठेवला आहे.
याशिवाय विविध मार्गाने जे शेतीपंप चालतील ते जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. सध्या पंढरपूर तालुक्यातील उन्हाचा कडाका वाढलेला असून पारा ४० अंशाकडे निघालेला आहे. अशा परिस्थिती पायथ्याला पाणी असूनही वीजपुरवठा बंद असल्याने सर्व शेती पंप बंद आहेत. केवळ दोन तासाच्या काळात पिकांना पाणी देणे शक्य नसल्याने शेतातील उभी पिके जाळून जात आहेत जनावरांना सुद्धा पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे पुरेसे पाणी व वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले पंढरपूर तालुकाध्यक्ष दीपक कवडे पंढरपूर शहराध्यक्ष शनी घुले उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रम वानकर नितीन देशमुख शैलेश चव्हाण विजय भोसले रविकांत माने आधी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment