स्मार्ट मीटरला ग्राहकांचा सर्वत्र विरोध; मनसेचा आंदोलनाचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 18, 2026

स्मार्ट मीटरला ग्राहकांचा सर्वत्र विरोध; मनसेचा आंदोलनाचा इशारा

 स्मार्ट मीटरला ग्राहकांचा सर्वत्र विरोध; मनसेचा आंदोलनाचा इशारा



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- राज्यभर महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असला, तरी अक्कलकोटसह संपूर्ण जिल्ह्यात या निर्णयाविरोधात ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असून त्यामागे ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

तालुक्यातील विविध भागांत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असताना ग्राहकांकडून अनेक तक्रारी पुढे येत आहेत. विशेषतः स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिले वाढल्याचा आरोप काही ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे या योजनेबाबत संशय आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याशिवाय अक्कलकोट शहर आणि ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या वीजखंडिततेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसातून पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह अक्कलकोटला येणाऱ्या स्वामी भक्तांनाही बसत असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आणि वीजपुरवठ्यातील अनियमिततेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष महिनाथ पाटील यांनी लवकरच मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.

मोठ्या संख्येने ग्राहकांनी या मोर्चात सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले. नियमित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळत नसताना ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याची टीका करत ही परिस्थिती सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, स्मार्ट मीटरविरोधातील वाढता विरोध लक्षात घेता हा मुद्दा येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्राहकांच्या तक्रारी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages