मुख्य जलवाहिनीतील गळतीमुळे बार्शीत पाच दिवसांपासून पाणीटंचाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 5, 2026

मुख्य जलवाहिनीतील गळतीमुळे बार्शीत पाच दिवसांपासून पाणीटंचाई

 मुख्य जलवाहिनीतील गळतीमुळे बार्शीत पाच दिवसांपासून पाणीटंचाई




बार्शी (कटूसत्य वृत्त) :- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील गळतीची समस्या अद्याप कायम असल्याने बार्शीकरांना गेल्या पाच दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा कोलमडला असून काही ठिकाणी अत्यल्प दाबाने पाणी येत आहे, तर काही परिसरांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. अनेक भागांमध्ये वेळापत्रकापेक्षा उशिराने पाणी मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर तसेच इतर पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत आहे.

बार्शी तालुका अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जात असल्याने येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अवलंबित्व जलस्रोत आणि पाणीपुरवठा यंत्रणेवर आहे. अशा परिस्थितीत उजनी जलवाहिनीतील गळतीमुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची गरज अधिक असताना पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी समस्या अद्याप पूर्णपणे सुटलेली नाही. तांत्रिक अडचणी आणि दुरुस्तीला लागणारा कालावधी यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब होत असल्याचे समजते. याबाबत नगरपालिका जलदाय अभियंता अजय होनखांबे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, शहरातील नागरिकांनी जलवाहिनीची कायमस्वरूपी दुरुस्ती करून भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.

नगरपालिका प्रशासनाने गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला आहे. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या बार्शीकरांचे लक्ष आता पाणीपुरवठा नेमका कधी सुरळीत होणार याकडे लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages