सब-ज्युनिअर व ज्युनिअर ॲक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली व महाराष्ट्र ॲक्वाटिक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर व ज्युनिअर ॲक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६ अंतर्गत डायव्हिंग स्पर्धांचा समारोप सोलापूर येथील अशोक चौक परिसरातील मार्कंडेय जलतरण तलावात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पदके, चषक व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील उदयोन्मुख जलतरणपटू व डायव्हर्स यांनी या स्पर्धेत सहभाग घेत आपल्या कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला. १ मीटर स्प्रिंग बोर्ड, ३ मीटर स्प्रिंग बोर्ड तसेच हाय बोर्ड डायव्हिंग या प्रकारांमध्ये मुला-मुलींनी उल्लेखनीय कामगिरी करत उपस्थितांची दाद मिळवली.
ही प्रतिष्ठेची राज्यस्तरीय स्पर्धा सोलापुरात यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी सोलापूरचे समन्वयक मनीष भावसार यांनी विशेष पुढाकार घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट ॲक्वाटिक असोसिएशनचे अध्यक्ष सुदेश देशमुख व सचिव संतोष कोल्हापुरे यांनीही आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.
बक्षीस वितरण समारंभात बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व विजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून सोलापूरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देणे ही आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नाझीर शेख, अध्यक्ष सुदेश देशमुख, सचिव संतोष कोल्हापुरे, समन्वयक मनीष भावसार तसेच महाराष्ट्र राज्य ॲक्वाटिक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.
विशेष म्हणजे, खासदार प्रणिती शिंदे यांनी यापूर्वी मार्कंडेय जलतरण तलावाच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, प्रेक्षकांसाठी बसण्याची शेड उभारण्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. खेळाडू आणि क्रीडा संघटनांना वेळोवेळी सहकार्य करत त्यांनी सोलापूरच्या क्रीडा विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
.png)
No comments:
Post a Comment