मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड
महिला रुग्णांना पुरुष विभागात भरती खा प्रणिती शिंदे संतप्त
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी अचानक मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देत तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णालयातील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
गेल्या आठवड्यात गावभेट दौऱ्यादरम्यान हाजापूर येथील ग्रामस्थ सिद्धेश्वर बिचुकले यांनी त्यांच्या नातेवाईक महिलेला बाळंतपणासाठी दाखल केल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची वागणूक, उपचारातील निष्काळजीपणा आणि रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालयात भेट दिली.
पाहणीदरम्यान रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोग्य सेवेतील अनेक त्रुटी खासदार प्रणिती शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. प्रसूत महिलांना दिला जाणारा आहार गेल्या दीड महिन्यांपासून बंद असल्याचे समोर आले. संबंधित ठेकेदाराची बिले प्रलंबित असल्याने रुग्णांना जेवण पुरवठा होत नसल्याची बाब उघड झाली. तसेच आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्रीचा अभाव, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि व्यवस्थापनातील ढिसाळपणा स्पष्टपणे दिसून आला.
यावेळी सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे महिला व पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणे आवश्यक असताना, ज्या विभागात प्रसूत महिलांना दाखल केले जाते त्याच ठिकाणी पुरुष रुग्णांनाही भरती करण्यात आल्याचे आढळून आले. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृहाची सुविधा नसल्याने त्यांच्या खाजगीपणाचा आणि सन्मानाचा गंभीर भंग होत असल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रुग्णालय परिसरातील अस्वच्छता, अपुरी सुविधा आणि प्रशासनाची उदासीनता पाहून संतप्त झालेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्यांनी सोलापूरचे सिव्हिल सर्जन यांच्याशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आणि पाच दिवसांच्या आत सर्व त्रुटी दूर करण्याच्या सूचना केल्या. अन्यथा संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची चेतावणीही खासदार प्रणिती शिंदे दिली.
रुग्णालयातील ओपीडी, औषधसाठा, कर्मचारी उपस्थिती, स्वच्छता व्यवस्था आणि रुग्णसेवेचा आढावा घेताना खासदार प्रणिती शिंदे यांनी आरोग्य सेवेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. रुग्णांचे सीबीसी तपासणीसाठी आवश्यक यंत्र उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सीएसआर निधीतून आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ग्रामीण रुग्णालये ही ग्रामीण जनतेसाठी जीवनवाहिनी असतात. अशा ठिकाणी सुविधांचा अभाव, प्रशासनाची उदासीनता आणि आरोग्य सेवेमधील निष्काळजीपणा अत्यंत गंभीर बाब आहे. आरोग्य सेवा पुरविताना होणारी हलगर्जीपणा ही केवळ प्रशासकीय चूक नसून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्यासारखी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून त्यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.
यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष ॲड. राहुल धुळे, काँग्रेसचे राज्य सचिव ॲड. रवीकिरण कोलेकर, जिल्हा समन्वयक मनोज उलगुलवार, काँग्रेस सोशल मीडिया तालुकाध्यक्ष संदीप पवार, कुंडलिक विचुकले आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment