शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 5, 2026

शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

 शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी

 लाखों शिवभक्तांची गर्दी उसळणार



रायगड (कटूसत्य वृत्त):- किल्ले रायगडावर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरवर्षी हजारो शिवभक्तांची गर्दी होते. मात्र यावर्षी तापमान अधिक असल्याने शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

गडाच्या पायथ्याशी तसेच गडावर विविध १३ वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार असून २४ तास रुग्णवाहिका आणि आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सध्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. नागरिकांना उष्माघात, चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा प्रकारच्या आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. त्यामुळे किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. आरोग्य विभागाने गडावर आणि पायथ्याशी विशेष वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि मुबलक औषधसाठ्यासह सज्जता ठेवली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दोन दिवस एकूण १३ विशेष वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी गडाच्या पायथ्याशी व परिसरातील प्रमुख मार्गांवर २४ तास रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय प्रत्येक थांब्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.

प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एकूण १३ विशेष वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये प्रत्येकी १ वैद्यकीय अधिकारी, १ समुदाय आरोग्य अधिकारी व एक आरोग्यसेवकाचा समावेश आहे. ही पथके कोंझर पार्किंग, वाघ जंक्शन, चित दरवाजा, महादरवाजा, वाळुसरे पार्किंग, पाचाड धर्मशाळा, नाणे दरवाजा, शिवसृष्टी पार्किंग (पाचाड गाव), कावळ्याचा माळ, मदारी मेहतर येथे तैनात करण्यात येणार आहेत. तसेच पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात ओपीडी व राखीव पथके तैनात करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages