ऋत्विज चव्हाण यांना राज्यस्तरीय ‘सह्याद्री कला रत्न’ पुरस्कार जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- चित्रकला आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सोलापूरचे युवा कलावंत ऋत्विज चव्हाण यांची प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘सह्याद्री कला रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. नालंदा फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
पुण्यातील श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित विशेष समारंभात ऋत्विज चव्हाण यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. अमूर्त शैलीतील चित्रकला आणि उत्स्फूर्त लेखन या क्षेत्रांतील त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या सोहळ्याला सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सुनील नाना गोडबोले, मराठी चित्रपट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन धवणे पाटील, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठी चित्रपट देऊळ बंद मधील बालकलाकार आर्या घारे यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.
नालंदा फाउंडेशनकडून विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून प्रस्ताव मागवून त्यांची निवड प्रक्रिया राबविण्यात येते. सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील कार्याचा सखोल आढावा घेऊन उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जातो.
ऋत्विज चव्हाण यांना जाहीर झालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे सोलापूरच्या कला आणि साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment