एन. बी. नवले सिंहगडला दुहेरी मानांकनाचा बहुमान; महाविद्यालयाची गुणवत्तेची मोहोर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव, सोलापूर यांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून महाविद्यालयाला राष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावर दुहेरी सन्मान प्राप्त झाला आहे.
देशातील नामांकित शैक्षणिक मूल्यांकन संस्था Careers360 ने महाविद्यालयाला ‘AA+’ रेटिंग प्रदान केले आहे, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या Academic and Administrative Audit (AAA) मध्ये महाविद्यालयाने 600 पैकी 550 गुणांसहीत उल्लेखनीय 91.66 टक्के गुणांसह ‘A++’ ग्रेड प्राप्त करून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.
देशातील अभियांत्रिकी शिक्षण संस्थांचे मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता, प्राध्यापकवर्ग, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, संशोधन कार्य, पायाभूत सुविधा, प्लेसमेंट, नवोपक्रम, विविधता आणि विद्यार्थी विकास या निकषांचा विचार केला जातो. या सर्व बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे Careers360 ने एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाला भारताच्या सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांपैकी एक म्हणून मान्यता देत AA+ रेटिंग प्रदान केले आहे.
याचबरोबर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ अंतर्गत सोलापूर विद्यापीठाच्या Academic and Administrative Audit समितीने केलेल्या सविस्तर मूल्यमापनात महाविद्यालयाने 91.66 टक्के गुणांसह ‘A++’ ग्रेड मिळवली. शैक्षणिक नियोजन, प्रशासकीय कार्यक्षमता, विद्यार्थी सुविधा, संशोधन संस्कृती, गुणवत्ता हमी उपक्रम, परीक्षा व्यवस्था आणि संस्थात्मक विकास या सर्व क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला आहे.
महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांत उद्योगाभिमुख शिक्षण, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधन व नवोपक्रमाला चालना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील प्लेसमेंट, कौशल्य विकास कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून संस्थेला सातत्याने विविध स्तरांवर मानांकन आणि गौरव प्राप्त होत आहेत.
या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे सहसचिव तथा सोलापूर कॅम्पसचे डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. आर. टी. व्यवहारे, सिंहगड संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सांगितले की, “राष्ट्रीय स्तरावरील AA+ रेटिंग आणि विद्यापीठाच्या AAA ऑडिटमधील A++ ग्रेड हे संपूर्ण शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. भविष्यातही गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण, संशोधन आणि उद्योगाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेची प्रगती अधिक उंचावण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
या दुहेरी मानांकनामुळे एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
.png)
No comments:
Post a Comment