सोलापूर-मुंबई विमानसेवा १ सप्टेंबरपासून होणार सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

सोलापूर-मुंबई विमानसेवा १ सप्टेंबरपासून होणार सुरू

 सोलापूर-मुंबई विमानसेवा १ सप्टेंबरपासून होणार सुरू




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नाईट लॅंडिंग व दृश्यमानतेचे कारण सांगून २८ जून ते ३१ ऑगस्ट असे सलग ६२ दिवस मुंबई विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय स्टार एअर कंपनीने घेतला आहे. पण कंपनीकडून सोलापूरकरांना दिलासा देणारा निर्णय घेत १ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा स्टार एअर कंपनी सोलापूरकरांच्या सेवेत येणार आहे.

१ सप्टेंबरपासूनचे तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे. कंपनी व तिकीट बुकिंग एजन्सीकडून या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे.

सोलापूर शहरातून विमानसेवा देणाऱ्या स्टार एअर व फ्लाय ९१ या दोन्ही कंपन्यांनी विमानसेवा बंद करण्याच्या निर्णयानंतर सोलापूरकरांनी नाराजी व्यक्त केली होती. याचा फटका शहराच्या विकासावर होणार असल्याच्याही प्रतिक्रिया आल्या होत्या. पण कंपनीने सप्टेंबर महिन्यातील वेळापत्रक जाहीर करून १ सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

यामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू राहणार असल्याचे समोर आले. सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू होण्यावर अद्याप प्रश्नचिन्हच आहे, सोलापूर ते गोवा विमानसेवा देणाऱ्या फ्लाय ९१ कंपनीकडून विमानसेवा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.

स्टार कंपनीकडून तिरुपतीसाठी चाचपणी...

सोलापूर ते तिरूपती विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. कंपनीकडून यापूर्वी तिरूपती विमानसेवेस सोलापुरातून किती प्रतिसाद मिळेल याची चाचपणी केली होती. पण कंपनीकडूनच याचा फारसा विचार केला नाही. पण पावसाळ्यानंतर तिरुपतीसाठी विमानेसवा सुरू करता येईल का या विचार कंपनी करत आहे. तिकिटाचे दर किती असावेत, सोलापूर ते तिरूपती ऐवजी इतर शहराचा समावेश करून विमानसेवा करता येईल या पर्यायावर कंपनी विचार करत आहे. सप्टेंबरपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages