आषाढी यात्रेसाठी जिल्हा परिषद सज्ज; वारकऱ्यांच्या सुविधांसाठी ६१.५० कोटींचा खर्च
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्ग आणि मुक्कामस्थळी जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पिण्याच्या पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा, महिला हिरकणी कक्ष, फिरते शौचालय, मोबाईल चार्जिंग व्हॅन आदी सुविधांसाठी विविध विभागांमार्फत **एकूण ६१ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च** करण्यात येणार आहे. यापैकी **२२ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त** झाला असून संबंधित निविदांना मंजुरी देण्यासाठी गुरुवारी पंढरपूर येथे जिल्हा परिषदेची विशेष सभा पार पडली.
जिल्हा परिषद अध्यक्ष **दीपक वैद्य** यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला उपाध्यक्ष **इंद्रजित पवार**, शिक्षण व आरोग्य सभापती **केदार सावंत**, समाजकल्याण सभापती **संस्कृती सातपुते**, महिला व बालकल्याण सभापती **अमृता वाघे**, कृषी व पशुसंवर्धन सभापती **रामाप्पा चिवडशेट्टी**, मुख्य कार्यकारी अधिकारी **कुशल जैन**, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी **संदीप कोहिनकर**, विभागप्रमुख, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
सभेत सदस्य **अतुल पवार** आणि **चरणराज चवरे** यांनी सांगोला, मोहोळ आणि माढा तालुक्यातून येणाऱ्या पालखी मार्गावरील वारकऱ्यांनाही सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सदस्य **वाघमारे** यांनी लक्ष्मी टाकळी गावासाठी पाच लाख रुपयांऐवजी १२ लाखांचा निधी देण्याची मागणी केली. तर सदस्य **व्यंकट भालके** यांनी यात्रा काळात खासगी डॉक्टर शहराबाहेर जात असल्याने भाविकांना अडचणी निर्माण होतात, असे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर खासगी डॉक्टरांनी यात्रा काळात रुग्णालयात उपलब्ध राहावे, याबाबत सूचना देण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
३८ मुक्काम, ४३ विसावे आणि ७ रिंगण सोहळे
यंदा दहा मानाच्या पालखी सोहळ्यांचे सोलापूर जिल्ह्यातील ८१ गावांमध्ये ३८ मुक्काम, ४३ विसावे आणि ७ रिंगण सोहळे** होणार आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ५ हजार तात्पुरती शौचालये, २३ जर्मन हँगर, ३७ वॉटरप्रूफ मंडप, १६७ हिरकणी कक्ष, ४० स्वागत कमानी, २२० पाणी टँकर, ५०० स्नानगृहे, १५ मोबाईल चार्जिंग व्हॅन, १३ मुख्यमंत्री आरोग्य रथ आणि ७५० चरणसेवा फूट मसाजर** उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर जिल्हा परिषदेकडून २३ स्वागत कमानी उभारल्या जाणार आहेत.
महिलांसाठी हिरकणी कक्षांची विशेष सुविधा
महिला वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या हिरकणी कक्षांमध्ये बेड, सॅनिटरी पॅड, पॅड वेंडिंग व डिस्पोजल मशीन, पिण्याचे पाणी, खुर्च्या, प्रकाश व्यवस्था, पंखे आणि कचरापेट्यांची सुविधा उपलब्ध असेल. आरोग्य विभागाकडून २,८२२ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, दिंडी प्रमुखांना ४,५०० औषध किटचे वितरण करण्यात येणार आहे.
पशुधनाच्या आरोग्याचीही काळजी
पालखी मार्गावर वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच आणि आपटा आदी प्रजातींच्या १० हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तसेच पालखीसोबत येणाऱ्या बैल व अश्वांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ९५ पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आषाढी यात्रेत लाखो वारकरी पंढरपूरकडे येत असल्याने त्यांच्या सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ प्रवासासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने यंदा व्यापक सुविधा उभारण्याचे नियोजन केले असून त्याची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे.

No comments:
Post a Comment