नजरचुकीने ५ ऐवजी ५० लाख रुपये ट्रान्सफर; ४५ लाख परत न केल्याचा आरोप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

नजरचुकीने ५ ऐवजी ५० लाख रुपये ट्रान्सफर; ४५ लाख परत न केल्याचा आरोप

नजरचुकीने ५ ऐवजी ५० लाख रुपये ट्रान्सफर; ४५ लाख परत न केल्याचा आरोप

बार्शी तालुका (कटूसत्य वृत्त) : बार्शी शहरातील एका व्यावसायिकाकडून ऑनलाईन व्यवहारादरम्यान झालेल्या चुकामुळे ५ लाख रुपयांऐवजी तब्बल ५० लाख रुपये दुसऱ्याच्या खात्यात वर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यक्तीने वारंवार मागणी करूनही उर्वरित ४५ लाख रुपये परत न केल्याने विश्वासघात व फसवणुकीप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित कटारिया हे बार्शी शहरातील पटेल चौक परिसरात कपड्याचा व्यवसाय करतात. दि. ७ जून रोजी त्यांचे मित्र सुशांत बाळकृष्ण शहाणे यांनी एका ग्राहकाच्या खात्यावर ५ लाख रुपये पाठविण्याची विनंती केली होती. त्यानुसार रामभाऊ सुनील मोरे यांचा बँक खाते क्रमांक कटारिया यांना पाठविण्यात आला.

सायंकाळी सुमारे ६.०९ वाजण्याच्या सुमारास अमित कटारिया यांनी नेट बँकिंगद्वारे संबंधित खात्यावर रक्कम हस्तांतरित केली. मात्र दुसऱ्या दिवशी बँकेचा संदेश तपासल्यानंतर त्यांच्या खात्यातून ५० लाख रुपये वळते झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर नेट बँकिंग व्यवहाराची पडताळणी केली असता ५ लाख रुपयांऐवजी चुकून ५० लाख रुपये पाठविल्याचे स्पष्ट झाले.

घडलेल्या प्रकाराची माहिती कटारिया यांनी सुशांत शहाणे, प्रशांत शहाणे आणि मुन्ना पिंजारी यांना दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून रामभाऊ मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्या खात्यात ५० लाख रुपये जमा झाल्याची कबुली त्यांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच प्राप्त झालेल्या रकमेपैकी ४५ लाख रुपये परत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

मात्र त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित व्यक्तीकडून ‘आज देतो, उद्या देतो’ अशी आश्वासने देण्यात आली. विविध बँकिंग कारणे पुढे करून रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी अमित कटारिया यांनी रामभाऊ सुनील मोरे (मूळ रा. साकत, ता. बार्शी, सध्या खापाबंदर, पौंडा, गोवा) यांच्याविरोधात विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages