अखेर नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा
- नसरापूरच्या चिमुकलीला न्याय
- अवघ्या दोन महिन्यांत ऐतिहासिक निकाल
पुणे (कटूसत्य वृत्त):- भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायाधीश एस.
आर. साळुंके यांनी सोमवारी फाशीची शिक्षा सुनावली. कांबळे याला विशेष न्यायालयाने गुरुवारी (२५ जून) दोषी ठरवून निकाल राखून ठेवला होता.
महाराष्ट्रदिनी १ मे रोजी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. या खटल्यात सरकार आणि बचाव पक्षाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला. न्यायालयात सरकार पक्ष, बचाव पक्ष; तसेच बालिकेच्या कुटुंबीयांच्या वतीने बाजू मांडण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी (२५ जून) कांबळे याला दोषी ठरवून आरोपपत्रात नमूद करण्यात आलेल्या कलमांना किती शिक्षा आहे, याची माहिती दिली होती. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.
या खटल्यात २० जूनला अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी (२५) सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि मूळ फिर्यादी यांनी आपली बाजू मांडली. या वेळी कांबळेला हजर करण्यात आले होते. तुझ्या विरोधात दोषारोपपत्रात नमूद असलेले सर्व आरोप सिद्ध झाले आहेत. तसेच दोषारोपपत्रात नमूद असलेल्या कोणत्या कलमांना किती शिक्षा आहे, याची माहिती न्यायालयाने आरोपीस दिली. 'हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मीळ' आहे. आरोपी कांबळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, आरोपी कांबळे याने केलेले कृत्य घृणास्पद, क्रूर आणि समाजमन हादरवणारे आहे. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा द्यावी. महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे अस्तित्वात आहेत. कायदे अस्तित्वात असताना अशा प्रकारचे गुन्हे घडतात. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना कायद्याचा धाक बसविण्यासाठी कठोर शिक्षा देण्यात यावी,' अशी विनंती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवादात केली होती. मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या १२ महत्त्वपूर्ण निकालांचा संदर्भ दिला होता. बचाव पक्षाकडून ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी बाजू मांडली.
सरकार पक्षाने सादर केलेला डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, सीसीटीव्ही चित्रीकरण, परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब या बाबी विचार घेऊन आरोपीने केलेला गुन्हा सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. पीडित बालिकेच्या शरीरावर १८ गंभीर जखमा झाल्याचे आढळून आले होते. आरोपीने यापूर्वी दोन महिलांवर अत्याचार केल्याचे न्यायाालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.
दोन महिन्यांत खटला निकाली
महाराष्ट्रदिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याच्या प्रकरणाचा निकाल हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासात दोन महिन्यांत सुनावणी होऊन निकाली लागणारा पहिला खटला ठरला. तपासासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक करण्यात आले. या पथकात सहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. या खटल्यात सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, साक्षीदारांची साक्ष अशा विविध बाजूंनी तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत न्यायालयात १२०० पानी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रासह ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचा जबाब, परिस्थितीजन्य पुरावे, तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले. विशेष न्यायालयात २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी झाली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने बंद दाराआड (इन कॅमेरा) सुनावणी झाली.
चौकट-
सरकार पक्षाचे युक्तिवादातील मुद्दे
आरोपीने नियोजन करून थंड डोक्याने खून केला.
दोन गुन्ह्यांत आरोपी निर्दोष सुटल्याने त्याला कायद्याचा धाक राहिला नाही.
सुनावणीच्या दरम्यान आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेश नाही.
आरोपी लैंगिकदृष्ट्या सक्षम.
मृत्युदंडाची शिक्षा याेग्य.
समाजात कठोर संदेश जाण्यासाठी कठोर शिक्षेची मागणी.
चौकट-
कांबळेला या कलमांनुसार शिक्षा
आराेपी भीमराव कांबळे याच्यावर कलम १३७ (२), ६५ आणि ६५ (बलात्कार), १०३ (खून), ७४ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने बळजबरी करणे), १४०, (१) यासह लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ या कलमांन्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले. या सर्व कलमांन्वये आरोप सिद्ध झाले आहेत.

No comments:
Post a Comment