पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाच्या तपपूर्ती निमित्त नरसिंह महायज्ञ - अमर साबळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 9, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाच्या तपपूर्ती निमित्त नरसिंह महायज्ञ - अमर साबळे

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाच्या तपपूर्ती निमित्त नरसिंह महायज्ञ - अमर साबळे 




पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):-  भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला १२ वर्ष पूर्ण होत आहेत. या तपपूर्ती निमित्त आणि नरेंद्र मोदी यांच्या तपसाधनेला व विकसित भारताच्या संकल्पाला आध्यात्मिक बळ मिळावे या उद्देशाने राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने "नरसिंह महायज्ञ" आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी, (दि.९ जून) दुपारी ३:३० वाजता, श्रीकृष्ण मंदिर, इस्कॉन, कात्रज, पुणे (इस्कॉन एनव्हीसीसी अण्णामृत) येथे या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य महायज्ञ कार्यक्रमास उपस्थित राहून या महान राष्ट्र कार्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक, माजी खासदार अमर साबळे यांनी केले आहे. 
    पिंपरी येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक माऊली थोरात, ॲड. मोरेश्वर शेडगे, ज्येष्ठ नेते विजय शिनकर आदी उपस्थित होते. 
   यावेळी साबळे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास" या मंत्राच्या माध्यमातून देशात विकासाचे नवे पर्व सुरू केले. सत्तेला उपभोगाचे साधन न मानता राष्ट्रसेवेची तपश्चर्या मानून त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. विकसित भारत २०४७ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांनी देशवासीयांना प्रेरित केले आहे, असे साबळे यांनी सांगितले. 
   या पार्श्वभूमीवर राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रार्थना व्हावी यासाठी महायज्ञात लक्ष्मी नारायणाच्या स्वरूपात अनेक जोडपी (पती पत्नी) सहभागी होऊन राष्ट्रकल्याणाचा संकल्प करणार आहेत. मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील विविध लोककल्याणकारी आणि विकासात्मक योजनांमुळे देशाच्या प्रत्येक घटकापर्यंत विकासाचे लाभ पोहोचले आहेत. गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, जल जीवन मिशन, डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा विकास, मेक इन इंडिया, राष्ट्रीय सुरक्षा, कलम ३७० रद्द करणे, महिला सक्षमीकरण आणि भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा या सारख्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे भारत देशाचे नाव जागतिक पातळीवर नव्या उंचीवर पोहोचले आहे.
    या नरसिंह महायज्ञाच्या माध्यमातून राष्ट्राच्या प्रगतीसाठी, विकसित भारताच्या स्वप्नपूर्ती साठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक प्रार्थना देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages