नाले स्वच्छ ठेवा, पाणी साचू देऊ नका; महापौर कोंड्याल यांचे अधिकाऱ्यांना आदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 5, 2026

नाले स्वच्छ ठेवा, पाणी साचू देऊ नका; महापौर कोंड्याल यांचे अधिकाऱ्यांना आदेश

 नाले स्वच्छ ठेवा, पाणी साचू देऊ नका; महापौर कोंड्याल यांचे अधिकाऱ्यांना आदेश




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने महापौर विनायक कोंड्याल यांनी आज नीलम नगर, अक्कलकोट रोड परिसरातील नवले नगर, विनायक नगर, वज्रेश्वरी नगर तसेच मुद्रा सन सिटी येथील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. मागील पावसाळ्यात या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पाहणीदरम्यान नाल्यांची स्वच्छता, पाण्याचा निचरा, अडथळे तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नवले नगर, विनायक नगर, वज्रेश्वरी नगर आणि मुद्रा सन सिटी परिसरात पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.
यावेळी वज्रेश्वरी नगर व मुद्रा सन सिटी परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाल्यांची पाहणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तसेच प्रस्तावित नाल्यांच्या कामांचा आढावा घेऊन पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाईल यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.
या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, नगरसेविका सारिका खजूरगी, नगर अभियंता सारिका आकूलवार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सुनील फुलारी, महेश येमूल, उपअभियंता प्रकाश दिवाणजी, मनोज जाधव, चिंतारे तसेच चंद्रकांत गुंडे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महापौरांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages