बार्शीत ‘जलतारा प्रकल्प’ प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 22, 2026

बार्शीत ‘जलतारा प्रकल्प’ प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

 बार्शीत ‘जलतारा प्रकल्प’ प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न


बार्शी (कटूसत्य वृत्त):- जलसंधारण, भूजल पातळीत वाढ व पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने, कृषी विभाग बार्शी व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला “जलतारा प्रकल्प” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे  यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले उपस्थित होते.
हा कार्यक्रम शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार आणि खजिनदार जयकुमार शितोळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कृषी अधिकारी गणेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे, कार्यालयीन अधीक्षक मोरे टी. एस. आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष शेंडे यांची सन्माननीय उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी आणि प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना “जलतारा शेतखड्डा” या संकल्पनेचे महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगताना, पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे, मृदा धूप रोखणे तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे यासाठी हा जलतारा शेतखड्डा कसा उपयुक्त आहे, याविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले.
केवळ सैद्धांतिक माहिती न देता, महाविद्यालयाच्या परिसरामध्ये मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी स्वतः उत्स्फूर्तपणे श्रमदान केले. यावेळी जेसीबीच्या मदतीने ५ फूट लांब, ५ फूट रुंद आणि ६ फूट खोल शोषखड्डा घेण्यात आला. त्यानंतर शास्त्रीय पद्धतीने त्यामध्ये पाषाणाचे काळे दगड ५.५ फूट उंचीपर्यंत रचून हा खड्डा पूर्णपणे भरून घेण्यात आला. या संकल्पनेनुसार, ७०० मिमी पाऊस पडल्यास अशा एका खड्ड्याद्वारे सुमारे ३ लाख ४० हजार लिटर पाणी जमिनीमध्ये मुरते, अशी तांत्रिक माहिती यावेळी प्रात्यक्षिकादरम्यान देण्यात आली.
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात अत्यंत उत्साहाने भाग घेतला आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकादरम्यान जलसंधारणाविषयी विविध नावीन्यपूर्ण प्रश्न विचारत आपली जिज्ञासा व्यक्त केली, ज्याचे उपस्थित तज्ज्ञांनी योग्य निरसन केले. अखेर कृषी महाविद्यालय व तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने, तसेच सर्वांच्या विशेष परिश्रमाने हा महत्त्वपूर्ण व पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages