दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विवाहितेची आत्महत्या, सासरच्या सात जणांवर गुन्हा
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील मैंदर्गी येथे कौटुंबिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मृत महिलेच्या आईच्या फिर्यादीवरून सासरच्या सात जणांविरोधात अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी (वय ३०, रा. मैंदर्गी) यांनी तोरणी रोडलगत असलेल्या विहिरीत आपल्या दोन वर्षांच्या मुलगा शिवराजसह उडी घेतल्याची माहिती नातेवाइकांनी माहेरी कळविली. घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीची आई कलव्वा बसप्पा पुजारी (रा. भोसगा पुजारी, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी, कर्नाटक) या नातेवाइकांसह घटनास्थळी दाखल झाल्या.
गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने विहिरीतून प्रथम दोन वर्षीय शिवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याला तातडीने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
यानंतर सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान भाग्यश्री यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांनाही मृत घोषित केले.
मृत भाग्यश्री यांच्या आईने दिलेल्या जबाबात, मुलीचा सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये तिपव्वा कट्टीमणी, शरणप्पा कट्टीमणी, सिद्धप्पा कट्टीमणी, समर्थ कट्टीमणी, नागनाथ कट्टीमणी, गगव्वा पुजारी आणि यालप्पा कट्टीमणी यांचा समावेश आहे. संबंधितांवर सासू, सासरे, पती, दोन दीर, नणंद आणि अन्य नातेवाईक म्हणून आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार अमोल माने करत आहेत.
No comments:
Post a Comment