करमाळा-टेंभुर्णी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळा-टेंभुर्णी मुख्य मार्गावरील आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेटसमोर बुधवारी (दि.२०) दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून काही काळ वाहतुकीतही गोंधळ निर्माण झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकी क्रमांक MH-45 W 4325 वरून दोन जण करमाळा-टेंभुर्णी मार्गाने प्रवास करत होते. यावेळी आदिनाथ कारखान्याच्या गेटसमोर भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील अभिमान मारुती कौले (वय ६०, रा. भोगेवाडी, ता. माढा) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात रोहिदास दिगंबर कौले (वय ४२, रा. भोगेवाडी, ता. माढा) हे गंभीर जखमी झाले असून, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमीला करमाळा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धडक देणारे वाहन ट्रक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावर न थांबता फरार झाला. त्यामुळे नेमके वाहन कोणते होते, याबाबत पोलिस तपास सुरू होण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अपघाताची तीव्रता पाहून उपस्थित नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. या मार्गावर भरधाव वाहनांमुळे अपघातांची मालिका सुरू असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment