विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा स्फोट; महाराष्ट्र सर्वांत पुढे
मुंबई (कटूसत्य वृत्त):- देशाच्या भविष्यासाठी घडणारी तरुण पिढीच आता गंभीर मानसिक संकटाच्या विळख्यात अडकत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२४ या वर्षात देशभरात तब्बल १४ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. म्हणजेच देशात दररोज सरासरी ४० विद्यार्थी स्वतःचे जीवन संपवत असल्याची भीषण वास्तवता समोर आली आहे.
शिक्षण, स्पर्धा, गुणांची शर्यत, पालकांच्या अपेक्षा आणि करिअरचा वाढता दबाव यामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण असह्य होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. शिक्षण क्षेत्र आणि समाजासाठी ही एक गंभीर धोक्याची घंटा मानली जात आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेत अपयश हे आत्महत्येमागील प्रमुख कारण ठरत असल्याचे समोर आले आहे. २०२४ मध्ये १ हजार ७१ विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेत अपयश आल्यामुळे आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. यामुळे गुण आणि यशाच्या मोजपट्टीवर विद्यार्थ्यांचे आयुष्य तोलण्याच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांवर वाढणारा अभ्यासाचा ताण, सोशल मीडियामुळे निर्माण होणारी तुलना, स्पर्धात्मक वातावरण, करिअरबाबतची अनिश्चितता आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे मानसिक तणाव वाढत आहे. अनेक विद्यार्थी नैराश्य, चिंता आणि एकटेपणाचा सामना करत असताना त्यांना योग्य वेळी मानसिक आधार मिळत नसल्याचेही दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. ही बाब अधिक चिंताजनक मानली जात असून, शिक्षण पद्धतीबरोबरच मानसिक आरोग्य व्यवस्थेचा गंभीर पुनर्विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.
शिक्षण म्हणजे केवळ गुणांची स्पर्धा नसून विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थैर्यही तेवढेच महत्त्वाचे असल्याची भावना आता अधिक ठळकपणे पुढे येत आहे. अन्यथा भविष्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment