मोहोळ ते वळसंग मार्ग होणार चारपदरी; ७४० कोटींची तरतूद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- तेरामैल राष्ट्रीय महामार्ग ४६५ अंतर्गत मोहोळ-कुरुल-कामती-मंद्रूप (बसवनगर)–औराद बंकलगी–वळसंग हा मार्ग चारपदरी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शोल्डरसह विकसित होणाऱ्या या रस्त्याची एकूण लांबी ८१.३७ कि.मी. असून, प्रकल्पाचा अंदाजित खर्च ७४०.३८ कोटी रुपये आहे.
या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून केंद्रीय स्टँडिंग फायनान्स कमिटीने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
या रस्त्याच्या उभारणीमुळे सोलापूर जिल्ह्यातील वाहतूक अधिक सुरक्षित व गतिमान होणार आहे. ग्रामीण व शहरी भागांमधील संपर्क सुधारण्यास मदत होणार असून व्यापार, उद्योग तसेच शेती क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.
तसेच या मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शेतमालाची बाजारपेठेपर्यंतची वाहतूक जलद व कमी खर्चात होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
नवी दिल्ली येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी या निधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.

No comments:
Post a Comment