पाठपुराव्यामुळेच निधी मंजूर - आमदार कल्याणशेट्टी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ-तेरामैल-वळसंग या ८१ किलोमीटरच्या नव्या रस्त्यासाठी ७४० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून, हा निधी आपल्या पाठपुराव्यामुळेच मिळाल्याचा दावा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केला आहे.
या मार्गावर मालवाहतूक, प्रवासी वाहतूक तसेच शेतकऱ्यांची अन्नधान्य वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे वाहतुकीचा ताण वाढून अपघातांचे प्रमाणही लक्षणीय आहे. शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, विद्यार्थ्यांचीही या मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर मोहोळ-तेरामैल-वळसंग रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आपण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश मिळून ७४० कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment