करमाळ्यात सराफ व्यावसायिकांचे निवेदन; पोलिसांवर खंडणी, मारहाणीचे गंभीर आरोप
करमाळा (कटूसत्य वृत्त):- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाणेतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सराफ व्यावसायिकांचे अपहरण, अमानुष मारहाण, बेकायदेशीर रिकव्हरी आणि खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप करत समस्त सराफ सुवर्णकार व संलग्न कारागीर व्यावसायिक बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक २३८/२०२६ च्या तपासाच्या नावाखाली पोलीसांनी कायद्याचे उल्लंघन करत सराफ व्यावसायिकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा कायदेशीर नोटीस न देता ताब्यात घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यामध्ये पीएसआय गणेश देशमुख आणि त्यांच्या डीबी पथकाचा उल्लेख करण्यात आला असून, हे कृत्य भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ अंतर्गत मिळालेल्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने ‘डी. के. बसू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य’ या खटल्यामध्ये अटक आणि चौकशी संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचेही उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संशयित अथवा आरोपींना मिळणाऱ्या मूलभूत अधिकारांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सराफ व्यावसायिकांकडून चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ रोजी जारी केलेल्या विशेष मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, संबंधित व्यावसायिकांना अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच दुकानातील कायदेशीर सोने-दागिने जबरदस्तीने आणण्यास भाग पाडून त्याची आटणी करून लगड तयार करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे “पोलीस संरक्षणात टाकलेला दरोडा” असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय, मदतीला गेलेल्या समाजबांधवांनाही पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. उमेश बुऱ्हाडे व इतरांना सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन त्यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले, तसेच त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेतील कलम ३५३ आणि ३५४ अंतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने जबाबांवर स्वाक्षऱ्या घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित न करता कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, त्यांच्यावर अपहरण, खंडणी, गंभीर दुखापत, पुराव्यांशी छेडछाड आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी करून बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सराफ व्यावसायिकांकडून अमानुष छळ करून हस्तगत करण्यात आलेला सोन्याचा ऐवज तात्काळ सन्मानाने परत करण्यात यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे वारंवार लेखी आणि प्रत्यक्ष तक्रारी देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांऐवजी सीआयडी किंवा विशेष तपास पथक (SIT) मार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जर दोषींवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर राज्यभर सराफ सुवर्णकार आणि संलग्न कारागीर व्यावसायिकांकडून तीव्र आंदोलन, रास्ता रोको, बेमुदत उपोषण आणि सराफ बाजारपेठ बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment