अच्छे दिन'च्या नावाखाली देशभरातील झुरळांची जिरवण्याचं काम सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 26, 2026

अच्छे दिन'च्या नावाखाली देशभरातील झुरळांची जिरवण्याचं काम सुरू

 अच्छे दिन'च्या नावाखाली देशभरातील झुरळांची जिरवण्याचं काम सुरू


पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत- रोहित पवार 

मुंबई (कटूसत्य वृत्त):- देशभरात वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि वाहतूक क्षेत्र आर्थिक संकटात सापडले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती, ग्रामीण भागातील डिझेल तुटवडा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यावरून त्यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

सोशल मीडियावरून सरकारवर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले की, देशात पेट्रोल-डिझेलचे दर मेलोडी चॉकलेटप्रमाणे दर तीन-चार दिवसांनी लिटरमागे एक-एक रुपयांनी वाढत आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, महागाईचा भडका उडाला आहे. आगामी काळात पेट्रोल आणि डिझेल थेट ५० रुपयांनी महागले तरी आश्चर्य वाटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

‘अच्छे दिन’च्या घोषणेवरून टीका करताना त्यांनी सरकारच्या निर्णयांवर उपरोधिक भाषेत हल्ला चढवला. सुरुवातीला टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे प्रयोग झाले, आता मात्र परदेशात फिरू नका, पेट्रोल-डिझेल वाचवा, सोनं खरेदी करू नका, तेल खाऊ नका, अशा प्रकारचे संदेश देणारे हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले ‘दैदिप्यमान’ सरकार ठरल्याची खोचक टीका त्यांनी केली.

देशातील वाढत्या इंधन संकटामुळे पेट्रोलपंपांवर लांबच लांब रांगा लागत असल्याचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, पुढील काळात ५० रुपये वाढ झाली तरी लोकांना कुणी एक लिटर पेट्रोल गिफ्ट देणार नाही. उलट अनेक तास रांगेत उभे राहूनही इंधन मिळेलच याची खात्री उरलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सरकारवर अधिक आक्रमक शब्दांत टीका करताना म्हटले की, ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सत्तेत आलेल्या सरकारने देशभरातील झुरळांची जिरवण्याचं काम सुरू केलं आहे. मात्र आता ही त्रस्त झुरळं संघटित होत असून, हीच सरकारसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, राज्यातील ग्रामीण भागात विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश विभागात डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीची कामे सुरू असताना शेतकऱ्यांना डिझेलसाठी १० ते १५ तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी आगाऊ रक्कम भरूनही डिझेल मिळत नसल्याने शेतकरी आणि पेट्रोलपंप चालक दोघेही अडचणीत आल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, सर्वाधिक तक्रारी मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातून येत असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर गंभीर सवाल उपस्थित केला. या भागातील नागरिकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पुरवठा साखळीतील बिघाडाकडे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांना साठेबाजी करायची नाही, तसेच तासन्तास रांगेत उभे राहण्यासाठी त्यांच्याकडे वेळही नसतो. त्यामुळे केवळ पेट्रोलपंप चालकांना निर्देश देऊन समस्या सुटणार नाही. सरकारने केंद्राशी समन्वय साधून वेळेत आणि पुरेशा प्रमाणात इंधन पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.

राज्यात आधीच वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या समस्यांमुळे ग्रामीण भाग त्रस्त असताना आता इंधन तुटवड्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. खरीप हंगामाच्या तयारीवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सरकारने तातडीने उपाययोजना न केल्यास आगामी काळात जनतेच्या संतापाचा मोठा उद्रेक होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages