झेडपीत अध्यक्ष-उपाध्यक्षांची धडक तपासणी; कर्मचाऱ्यांची गैरहजेरी उघड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, May 29, 2026

झेडपीत अध्यक्ष-उपाध्यक्षांची धडक तपासणी; कर्मचाऱ्यांची गैरहजेरी उघड

 झेडपीत अध्यक्ष-उपाध्यक्षांची धडक तपासणी; कर्मचाऱ्यांची गैरहजेरी उघड  

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्रशासनातील शिस्त, स्वच्छता आणि कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी बुधवारी विविध विभागांना अचानक भेट देत धडक तपासणी केली. या पाहणीत अनेक विभागांतील अनियमितता, अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची गैरहजेरी उघड झाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अनुपस्थित कर्मचाऱ्यांना तातडीने नोटिसा बजावण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आले.
पाहणीची सुरुवात रेकॉर्ड विभागापासून करण्यात आली. या विभागात दप्तर, फायली, टेबल-खुर्च्या तसेच कपाटे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली दिसून आली. रेकॉर्ड व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी संताप व्यक्त केला. “या विभागाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे?” अशी विचारणा त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना समाधानकारक माहिती देता आली नाही. अध्यक्ष व उपाध्यक्षांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात कर्मचारी अपयशी ठरल्याने संबंधित विभागप्रमुखांना तातडीने बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाची पाहणी करण्यात आली. या विभागात सर्वत्र अस्वच्छता, सांडलेले पाणी आणि रिकाम्या खुर्च्या आढळून आल्या. अनेक कर्मचारी आपल्या टेबलवर अनुपस्थित असल्याचे दिसून आले. याबाबत शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता काही कर्मचारी बाहेर गेले असून काही जेवणासाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. तसेच काही कर्मचारी रजेवर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. मात्र त्यांच्या रजेची कोणतीही अधिकृत नोंद अथवा पुरावा तत्काळ उपलब्ध करून देता आला नाही.
त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आली. विविध विभागांतील कामकाज, उपस्थिती नोंदी, स्वच्छता आणि प्रशासनिक शिस्त यांची सखोल पाहणी करण्यात आली.
नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा मिळावी, यासाठी प्रशासनातील शिस्तभंग सहन केला जाणार नाही, असा इशाराही अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी यावेळी दिला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages