बार्शीत इंग्रजी माध्यमाच्या नगरपालिका शाळेसाठी हालचाली वेगवान
बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी शहरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण माफक फीमध्ये उपलब्ध व्हावे, या उद्देशाने माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मंत्रालयात शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. शहरातील कुर्डुवाडी रस्त्यावरील ढगे मळा, सिद्धेश्वर नगर येथे बार्शी नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नगरपालिका शाळा क्रमांक २१ साठी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाची नवीन शाळा सुरू करण्यास स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर मान्यता देण्याची मागणी त्यांनी केली.
आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व वाढत असून, बार्शी शहर व तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. नगरपरिषदेच्या निधीतून एक एकर जागेत अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी नगरपालिका शाळा क्रमांक २१ उभारण्यात आली आहे.
या शाळेत आधुनिक पॅटर्ननुसार शिक्षण दिले जाणार असून, अतिशय माफक फी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील पालकांनाही आपल्या पाल्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणे शक्य होणार आहे.
राजेंद्र राऊत यांनी मांडलेली भूमिका ऐकल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी शिक्षण खात्याच्या सचिवांना यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत.
मंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे लवकरच बार्शीतील विद्यार्थ्यांना आपल्या शहरातच आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे बार्शी शहर व तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
.png)
No comments:
Post a Comment