पुढील २-३ दिवसांत मान्सून केरळात धडकणार; जळगावसह महाराष्ट्रात हवामान बदलाचे संकेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 30, 2026

पुढील २-३ दिवसांत मान्सून केरळात धडकणार; जळगावसह महाराष्ट्रात हवामान बदलाचे संकेत

 पुढील २-३ दिवसांत मान्सून केरळात धडकणार; जळगावसह महाराष्ट्रात हवामान बदलाचे संकेत


मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात भीषण उष्णता आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार असून पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार होत आहे. दरम्यान पुढील ५ दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून जळगाव जिल्ह्यामध्येही हवामानात बदल होण्याची चिन्हे आहेत.

मान्सूनचा प्रवास कालपर्यंत लक्षद्वीपपर्यंत पोहोचला होता. मात्र आज त्याची पुढील वाटचाल थोडी मंदावली. तरीदेखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून पुढील २ ते ३ दिवसांत तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पावसाचा जोर थोडा वाढू शकेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार,आज विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाट आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांमध्येही हवामानात बदल होण्याची चिन्हे आहेत. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages