शेतकरी हितासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा – आ. रणजितसिंह मोहिते-पाटील
अकलूज (कटूसत्य वृत्त):- मुंबई येथे झालेल्या इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत उद्योगाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
यावेळी निती आयोग, नवी दिल्ली यांना सादर करण्यात येणाऱ्या पत्राच्या मसुद्यासह उद्योगाच्या विविध मागण्यांवर संचालक मंडळ व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली. साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवन या उद्योगाशी जोडलेले असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या ऊर्जा स्वावलंबनासाठी साखर उद्योगाने इथेनॉल निर्मितीत मोठी गुंतवणूक केली असली तरी अलीकडे धान्यावर आधारित इथेनॉल निर्मितीकडे वाढलेल्या कलामुळे साखर आधारित इथेनॉल क्षमतेचा अपेक्षित वापर होत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
ऊर्जा सुरक्षा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने सकारात्मक व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आ. मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment