बेपत्ता अल्पवयीन मुलीसाठी संतप्त नातेवाईकांचे पोलीस ठाण्यासमोर उपोषण
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील इंदिरानगर परिसरातून एका अल्पवयीन मुलीचा मागील १५ ते २० दिवसांपासून काहीच मागमूस लागत नसल्याने परिसरात तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून समाधानकारक कारवाई होत नसल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी थेट मंद्रूप पोलीस ठाणे समोर उपोषण सुरू केले आहे.
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, एवढ्या कालावधीनंतरही मुलीचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “आम्ही वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेत आहोत, पण ठोस उत्तर मिळत नाही,” असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नातेवाईकांनी सांगितले की, “मुलगी बेपत्ता झाल्यापासून आम्ही अनेक वेळा पोलिसांकडे धाव घेतली, विनंती केली; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला.”
पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेल्या या उपोषणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे मंद्रूप परिसरातील नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. “एखादी अल्पवयीन मुलगी २० दिवस बेपत्ता असताना पोलिसांकडून तातडीची कारवाई का होत नाही?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांची कार्यपद्धती आणि तपासातील ढिलाई यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः हस्तक्षेप करून तपासाला गती द्यावी, अशी जोरदार मागणी नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. “आमच्या मुलीचा तातडीने शोध लावा,” अशी आर्त हाक उपोषणकर्त्यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलगी बेपत्ता होऊनही दीर्घकाळ ठोस प्रगती न होणे ही गंभीर बाब असून, यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात लवकरात लवकर यश मिळाले नाही, तर जनतेचा पोलिसांवरील विश्वास आणखी ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, येत्या काही तासांत पोलीस यंत्रणा काय पावले उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
.png)
No comments:
Post a Comment