IDE बूटकॅम्प 2026चा उत्साहात समारोप
विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना नवी दिशा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे आयोजित पाच दिवसीय ‘इनोव्हेशन, डिझाईन अँड एंटरप्रेन्योरशिप (IDE) बूटकॅम्प 2026’चा शुक्रवारी उत्साहात समारोप झाला. ६ ते १० एप्रिल दरम्यान झालेल्या या बूटकॅम्पमध्ये विद्यार्थ्यांच्या नवकल्पना आणि स्टार्टअप संकल्पनांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) व केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल (MIC) यांच्या पुढाकारातून, वाधवानी फाउंडेशन आणि SBI फाउंडेशन यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बूटकॅम्पसाठी सिंहगड संस्थेची राष्ट्रीय स्तरावर ‘नोडल सेंटर’ म्हणून निवड करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सौरभ निर्मले यांनी विद्यार्थ्यांना नवकल्पनांच्या माध्यमातून समाजातील समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ. व्ही. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्टार्टअप संस्कृती आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. वाधवानी फाउंडेशनच्या मास्टर ट्रेनर पल्लवी बिरादार यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, संशोधन संचालक प्रा. एस. एच. पवार आदींची उपस्थिती होती.
बूटकॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक व औद्योगिक समस्यांवर आधारित विविध प्रकल्प सादर केले. मार्गदर्शकांच्या सहकार्याने साकारलेल्या या प्रकल्पांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निवडक प्रकल्पांना पुढील टप्प्यासाठी मार्गदर्शन देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. डी. नवले यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुनील शाखापुरे व डॉ. मुदस्सर नाईकवाडी यांनी संयोजनाची धुरा सांभाळली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
निवड झालेले प्रकल्प:
फिक्स फर्स्ट (श्री रामकृष्ण कला व विज्ञान महाविद्यालय, कोयंबतूर), फिजिओ बडी व इकोब्रिक (वालचंद तंत्रज्ञान संस्था, सोलापूर), रूरल रिअल्ट (सार्वजनिक अभियांत्रिकी महाविद्यालय, सूरत) आणि मत्स्य एआय (आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे) या पाच प्रकल्पांची पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
सिंहगड इन्स्टिट्यूटचे कौतुक:
देशभरातील सुमारे २५० विद्यार्थी या बूटकॅम्पमध्ये सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. समारोपावेळी विद्यार्थ्यांनी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या नियोजनाचे आणि प्रशस्त कॅम्पसचे विशेष कौतुक केले. “पाच दिवस कसे गेले कळलेच नाही,” अशी भावना व्यक्त करत पुन्हा भेट देण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
.png)
No comments:
Post a Comment