जिल्हा परिषद बांधकाम समिती सदस्यपदी नेताजी खंडागळे
कासेगाव (कटूसत्य वृत्त): भारतीय जनता पक्षाचे (भाजप) बोरामणी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले सदस्य नेताजी खंडागळे यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांच्या कार्याला नवे बळ मिळाले असून, जिल्ह्यातील विकासकामांमध्ये त्यांची भूमिका अधिक प्रभावी ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीमार्फत रस्ते, इमारती तसेच ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे या समितीला प्रशासनिक आणि राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना नेताजी खंडागळे म्हणाले, “जनतेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला न्याय देण्यासाठी पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम करणार आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल.”
त्यांच्या निवडीबद्दल भाजप कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment