साेलापूरात मध्यरात्री अभूतपूर्व उत्साहात महामानवास अभिवादन
'जय भीम'च्या घोषणांनी दणाणून गेला!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पार्क चौकात मध्यरात्री बारा वाजताच भीमसैनिकांचा उत्स्फूर्त जनसागर उसळला आणि परिसर "जय भीम"च्या घोषणांनी अक्षरशः दणाणून गेला.
निळ्या झेंड्यांच्या साक्षीने संपूर्ण चौक भीममय झाला होता. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत हजारो नागरिकांनी कृतज्ञतेने अभिवादन केले; त्या क्षणी वातावरणात अभिमान, आदर आणि भावनांचा संगम अनुभवायला मिळत होता. चौकात उभारलेल्या पुस्तकांच्या स्टॉल्स, बाबासाहेबांच्या प्रतिमा, झेंडे आणि विविध साहित्यामुळे विचारांचा जणू जिवंत उत्सव रंगला. तरुणाईबरोबरच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग दिसून आला.
मध्यरात्रीचे साडेअकरा वाजले होते, पार्क चौकात भीमसैनिक कुटुंबासह जमा होत होते. पाहता पाहता चौकात हजारो भीमसैनिकांची गर्दी जमली होती. निमित्त होते राज्यघटनेच्या शिल्पकाराची १३५ वी जयंती. रात्री १२ वाजताच सर्वांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, निळ्या गुलालाची उधळण, 'जय भीम'चा जयघोष असा अभूतपूर्व उत्साह तेथे पाहायला मिळाला. रंगीबेरंगी फटाक्यांनी आकाश उजळून निघाले होते. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीचे व्हिडिओ शूटिंग केले.
अभिवादनासाठी राजाभाऊ सरवदे यांच्यासह ॲड. संजीव सदाफुले, सुशील सरवदे, बापू कांबळे, खंडू साबळे, अरुण भालेराव, आनंद चंदनशिवे तसेच रॉकी बंगाळे आदी उपस्थित होते. पार्क चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील होता. पोलिस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर, मच्छिंद्र पंडित, सदर बझार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, सुशांत वरळे, सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment