अक्कलकोट नगरपरिषदेच्या सभेत विकासकामांवर महत्त्वपूर्ण निर्णय; २५ पैकी २४ ठराव मंजूर
अक्कलकोट (प्रतिनिधी) : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि विविध प्रलंबित कामांबाबत अक्कलकोट नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. एकूण २५ विषयांपैकी २४ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली, तर शहरात येणाऱ्या वाहनांवर स्वच्छता शुल्क आकारण्याचा प्रस्ताव पुढील निर्णयासाठी तहकूब ठेवण्यात आला.
ही सभा गुरुवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले. त्यानंतर विविध विकासकामांना हिरवा कंदील देण्यात आला.
दक्षिण महाद्वार परिसरातील देवस्थानच्या नियोजित स्वागत कमान प्रवेशद्वार तसेच मुरलीधर मंदिरासमोरील दर्शन मंडप प्रवेशद्वारास ‘कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच खासबाग येथील चौकाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक’ असे नाव देण्याचा ठरावही एकमताने संमत झाला.
शहराचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन दर गुरुवारी मांसविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयावरून सभेत राजकीय वाद रंगला. काँग्रेसचे नगरसेवक मुस्तफा बळोरगी यांनी हा निर्णय नियमबाह्य असल्याचे सांगत विरोध दर्शविला, तर भाजपच्या नगरसेवकांनी या ठरावाला पाठिंबा देत तो मंजूर केला.
याशिवाय पाणीपुरवठा, रस्ते विकास, वीजखांबांचे स्थलांतरण, अनधिकृत नळजोडण्यांवर दंड, तलाव विकास आदी महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. ‘अमृत २’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पास मुदतवाढ देण्यासही मंजुरी देण्यात आली.
शहरातील पथदिवे बसविणे, नवीन लाईट्स व देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी एम.एस. बीएसी इन्फ्राटेक प्रा. लि. या संस्थेसोबत १० वर्षांचा करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहाच्या नूतनीकरणासह इलेक्ट्रिकल फिटिंग, नवीन जनरेटर किंवा सोलार इन्व्हर्टर बसविण्यास मंजुरी देण्यात आली.
नगरपरिषदेच्या मालकीच्या शॉपिंग सेंटर इमारती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असून हालचिंचोळी तलाव उत्पन्नवाढीसाठी भाडेतत्त्वावर देण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच नव्या न्यायालयीन इमारतीसाठी पोहोच रस्ता विकसित करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला.
सभेस मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, पक्षनेते यशवंत धोंगडे, बांधकाम सभापती सद्दाम शेरीकर, पाणीपुरवठा सभापती देविदास कवटगी, आरोग्य सभापती अविनाश मडिखांबे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली शिंदे, शिक्षण सभापती अपर्णा सिद्धे यांच्यासह नगरसेवक व नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment