पंढरपुरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 20, 2026

पंढरपुरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

 पंढरपुरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंतीनिमित्त पंढरपुरात शनिवारी भव्य मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला. या मिरवणुकीत हजारो भीमसैनिकांसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत जल्लोष साजरा केला. यावेळी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने पंढरपूर येथील विविध जयंती मिरवणुकीचे स्वागत ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली .त्यांनी लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत केली. असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगून सर्व भीमसैनिकांना शुभेच्छा दिल्या.
      या मिरवणुकीत विद्युत रोषणाई व फुलांनी सजवलेल्या ट्रक, टेम्पो व रथांमध्ये डॉ.बाबासाहेब व गौतमबुद्ध यांच्या  प्रतिमा ठेवल्या होत्या. ढोल-ताशा, फटाक्यांची आतिषबाजी; तसेच पारंपारिक वाद्य यावर भीमसैनिक व महिलांनी नृत्य करत उत्सवाचा आनंद लुटला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर भारावून गेले होते. सायंकाळी सात वाजेनंतर शहरातील विविध भागांतून मिरवणुकांना प्रारंभ झाला.  मिरवणुकांमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रेरणादायी मूर्ती, देखावे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.मिरवणूक मार्गावर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि मंडळांनी स्वागत मंच उभारून सहभागींचे जंगी स्वागत केले. मिरवणुकी दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून  चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
       यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री श्री. गोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच मध्यवर्ती समितीच्या वतीने पालकमंत्री गोरे यांचा सन्मान मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष अभिराज उबाळे यांच्यावतीने  करण्यात आला.
     
    मिरवणूक  स्वागत प्रसंगी पंचायत समिती सभापती  शुभम आगवणे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे,  मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष अभिराज उबाळे, उपाध्यक्ष विशाल मांदळे, कार्याध्यक्ष महेश मोटे, नगरपरिषदेचे नगरसेवक यांच्यासह इतर मान्यवर,पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages