व्हीआयपी दर्शन बंदचा रांगेतील वारकऱ्यांना लाभ : माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी व कार्तिकी वारीच्या नियोजनादरम्यान व्हीआयपी दर्शनावर निर्बंध आणण्यात यश आल्यामुळे दर्शन रांगेतील हजारो वारकऱ्यांना मोठा लाभ झाला, अशी समाधानाची भावना माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केली. पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली झाली असून सोलापूर सोडण्यापूर्वी त्यांनी पंढरीत येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समिती व मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. वारी काळात त्यांनी आठ दिवस पंढरपूरमध्ये मुक्काम करून भाविकांच्या सोयीसुविधांवर लक्ष केंद्रित केले होते.
गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामांविषयी विचारले असता, सोलापूर येथे विमानसेवा सुरू करणे, उजनी जलपर्यटन आणि आयटी पार्क प्रकल्पांना गती देणे ही महत्त्वाची कामे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पंढरपूर वारीचा अनुभव वेगळाच असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, वारकरी तासन्तास दर्शनासाठी रांगेत उभे राहत असतात. वारीदरम्यान मोठ्या प्रमाणात व्हीआयपी दर्शन सुरू असल्याने सामान्य वारकऱ्यांना विलंब होत होता. ही बाब लक्षात घेऊन व्हीआयपी गेट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यावर नियंत्रण आणण्यात यश मिळाले. त्यामुळे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झाला, असे त्यांनी सांगितले.
पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा निधी मिळण्याबाबत विचारले असता, या कामाला निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पंढरपूरकडे येणाऱ्या सात प्रमुख रस्त्यांसाठी साडेतीनशे कोटींहून अधिक निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या तथा नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक संदेश भोसले, राजेंद्र सुभेदार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment