सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रधानमंत्री किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या १ हजार ३८७ शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. यासह शेतकरीहिताच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही त्यांनी लक्ष वेधले.
गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रॅक्टर अनुदानापासून वंचित असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळावे, अशीही मागणी देशमुख यांनी केली. रासायनिक खतांच्या पुरवठ्यात कंपन्यांकडून होणारे ‘लिंकिंग’ त्वरित बंद करावे, तसेच शेजारील राज्यांतून येणाऱ्या अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाण्यांवर बंदी घालावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय ‘साथी’ पोर्टलचा वापर विक्रेत्यांवर सक्तीने न लादता तो उत्पादक व पुरवठादार कंपन्यांपुरताच मर्यादित ठेवावा, खतांचा पुरवठा एफओआर पद्धतीने करावा, बियाण्यांचे नमुने अपयशी ठरल्यास विक्रेत्यांना आरोपी न धरता साक्षीदाराचा दर्जा द्यावा, तसेच गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची प्रलंबित रक्कम शासनाने तातडीने अदा करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.
खरीप हंगाम २०२६ साठी युरिया व डीएपी खत वितरण पद्धतीचा फेरविचार करावा, तसेच शेजारील राज्यांतून येणाऱ्या अवैध व निकृष्ट दर्जाच्या कृषी मालावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही देशमुख यांनी मांडली.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना तपासणी करून योग्य निर्देश दिले जातील. शेतकरी व कृषी व्यवसायिकांना दिलासा मिळेल, अशा उपाययोजना लवकरच राबवण्यात येतील, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
No comments:
Post a Comment